बांधकाम सुरक्षिततेसाठी क्रेडाई-पुणे मेट्रोने अधोरेखित केली आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके स्वीकारण्याची गरज  

पुणे :  बांधकामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी छुप्या धोक्यांचे मूल्यांकन करणे गरजेचे असून, बांधकाम प्रकल्पांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके स्वीकारण्याची गरज असल्याचे मत सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

क्रेडाई-पुणे मेट्रोतर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’अंतर्गत ४ ते ११ मार्च यादरम्यान पुण्यात ‘सुरक्षा जागरूकता कार्यक्रम’ संपन्न झाला. या कार्यक्रमात सुरक्षा तज्ज्ञ, सरकारी अधिकारी आणि विकासक अशा १३० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य वित्त अधिकारी किरण गावडे, कामगार विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त एम.ए. मुजावर, डी.डी. पवार, पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशनच्या कार्यकारी समितीचे सदस्य ई.आर.रामनाथ भट, नाईकनवरे ग्रुपच्या गुणवत्ता आणि सुरक्षा विभागाचे उपमहाव्यवस्थापक अशोक ताम्हणकर,
तसेच क्रेडाई-पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, कामगार कल्याण समिती संयोजक सपना राठी, सह संयोजक पराग पाटील, नवीन अग्रवाल, कुणाल बंठिया, कुणाल चुघ, लीना कुकरेजा, महासंचालक डॉ.डी.के अभ्यंकर,महाव्यवस्थापक उर्मिला जुल्का,कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय बांधकाम उद्योगातील सेफ्टी कल्चर’ या विषयावरील सादरीकरणात अशोक ताम्हणकर यांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अंगीकारण्याची गरज, बांधकाम पर्यवेक्षकांनी छुपे धोके कसे ओळखले पाहिजेत, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग कसे शोधावेत, प्रचलित अभियांत्रिकी पद्धतींद्वारे परिस्थितीचे आकलन कसे करावे आणि अपघातांना प्रतिबंध कसा करावा यावर भर दिला.
ताम्हणकर म्हणाले, “ यूएई सह इतर देशांत विकासक, आर्किटेक्ट, डिझाइनर आणि अभियंते साइटवरील अपघात टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. त्याचप्रमाणे आपल्यालाही अत्याधुनिक सुरक्षा उपायांचा अवलंब करावा लागेल.”
बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींबाबत बोलताना ई.आर. रामनाथ भट यांनी बांधकाम प्रकल्पाची सुरक्षितता ही आर्थिक, कायदेशीर, मानवतावादी दृष्टीकोनावर आधारित असावी तसेच करारात नमूद केलेल्या अटी-शर्थीचे काटेकोर पालन व्हावे, यावर भर दिला.

कार्यक्रमात रणजित नाईकनवरे म्हणाले, “ बांधकाम साइटवर होणारे अपघात हे मुख्यतः दोषपूर्ण मचान आणि कामगार आराखडा तयार करणे आणि शटरिंग बिघाडामुळे होतात. बांधकाम पद्धतीत अनेक बदल घडत आहेत आणि नवीन तंत्रज्ञानही वापरले जात. आपण आपल्या साइट्सवर खरोखरच सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करणार आहोत का, हे आपल्याला स्वतःला विचारावे लागेल. आम्ही क्रेडाई सदस्य विकासक हे नेहमीच ही काळजी घेत असतो की कोणत्याही प्रकल्प अभियंत्याने सेफ्टी किट आणि सुरक्षा साहित्य मागितल्यास त्याला ते साहित्य देणे कधीही नाकारले जाणार नाही.”

पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य वित्त अधिकारी किरण गावडे म्हणाले, “आपण सुरक्षा सप्ताह ‘साजरा’ करण्यापेक्षा तो ‘पाळला’ पाहिजे. सुरवातीपासूनच सुरक्षिततेचे उपाय अवलंबले पाहिजेत. मोठे अपघात टाळण्यासाठी छोट्या छोट्या त्रुटीकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे. सुरक्षा उपाययोजनांबद्दलची आपली मानसिकता बदलून ती आपल्या जीवनाचा भाग बनवली पाहिजे.”

एम.ए. मुजावर यांनी मजुरांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा, गृहकर्ज, माध्यान्ह भोजन, सुरक्षा आणि आवश्यक साहित्य यासह विविध विशेषाधिकारांसाठी बीओसीडब्ल्यू कायद्यांतर्गत मजुरांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन कंत्राटदारांना केले. ते म्हणाले की, ” गेल्या 5 वर्षांत सुमारे 1.86 लाख मजुरांनी बीओसीडब्ल्यूकडे नोंदणी केली आहे आणि उर्वरित सर्व मजुरांची नोंदणी तातडीने करण्याची गरज आहे.”
डी.डी. पवार म्हणाले, “आम्ही  एक गट स्थापन केला आहे, जो नियमितपणे पुण्यातील सर्व बांधकाम साईट्सला भेट देऊन पाहणी करण्यासाठी आणि त्रुटी शोधण्यासाठी सरकारी कामगार अधिकाऱ्यांना सहकार्य करेल. त्याचबरोबर प्रकल्पाच्या रचनेमध्ये धोकादायक संरचना किंवा कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असलेल्या इतर सामग्रीचा वापर करू नये, अशा सूचना अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तर मजुरांना साइटवर प्रवेश देण्यापूर्वी त्यांची सुरक्षा उपकरणे योग्य आहेत की नाही याबाबतची खात्री  पर्यवेक्षकांनी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग पाटील यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: