Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

सत्ताधारी नगरसेवकांचे प्रकल्प लोकहिताचे : चंद्रकांत पाटील

पुणे : महानगपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केवळ रस्ते, ड्रेनेज, कचरा यामध्ये अडकून न राहता मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असे प्रकल्प करण्यावर भर दिला. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेला रक्तपेढीचा महत्वकांक्षी प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या कामांचे कौतुक केले.

पुणे महानगपालिकेच्या वतीने मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मध्ये उभारण्यात आलेल्या मधुकर सखाराम बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, नंदिनी मधुकर बिडकर, निलेश आल्हाट, बाळासाहेब पाटोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

पाटील पुढे म्हणाले की, पालिकेकडे स्वतःची अशी रक्तपेढी नव्हती. रक्ताची निर्मिती कृत्रिम पद्धतीने करता येत नाही. त्यामुळे रक्त संकलन आणि रक्तसाठा करण्यासाठी रक्तपेढीची गरज होती. ही बाब लक्षात घेत पालिकेची स्वतःची पहिली रक्तपेढी सुरू होत आहे. पालिकेत नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडताना भाजपच्या नगरसेवकांनी सतत पुणेकरांच्या हिताचे प्रकल्प राबविले आहेत. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना, नदी सुधारणा, सांडपाणी प्रकल्प याबरोबरच विविध भागात उड्डाणपूल, अर्बन स्ट्रीट डिझाईनचे रस्ते यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी करोनाच्या काळात पालिकेने आपली आरोग्य व्यवस्था सक्षम केली. पालिकेकडे आज काही हजार ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. पालिका स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करत आहे. यासाठी स्वतःची रक्तपेढी असणे आवश्यक होते. ती जबाबदारी बिडकर यांनी घेतली आणि यशस्वीपणे पूर्ण केली.

अत्याधुनिक लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देणार 

कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गणेश बिडकर यांच्या विकास निधीतून अत्याधुनिक लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाच्या सर्व मजल्यांवर नवीन एलईडी लाईट, पंखे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला २५ किलोवॅट विजेची बचत होत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading