नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांनी ताबडतोब सोडवावेत : डॉ. कैलास कदम

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून ओळखली जात असतानाही अनेक मुलभूत प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. मागील पाच वर्षात भाजपाच्या सत्तेच्या काळात पाणी, वाहतूक, नदी प्रदूषण, कचरा समस्या, आरोग्य विषयक समस्यांनी तर उग्ररुप धारण केले आहे. या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यास भाजपाचे मनपातील पदाधिकारी अपयशी ठरले आहेत. १४ मार्च पासून मनपाचे कामकाज प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील पाहणार आहेत. आयुक्त पाटील हे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी प्रशासक पदाच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे आणि कर देणा-या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.

डॉ. कैलास कदम यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत आयुक्तांची मनपा भवन मध्ये भेट घेतली. यावेळी त्यांना नागरिकांच्या समस्यांविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी कॉँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप दूर झालेली नाही. शहरातील अनेक दाट नागरी लोकवस्तीच्या भागातून नाले, गटार लाईन, स्ट्रॉम वॉटर, मलनि:सारण लाईन गेलेल्या आहेत. सदरहू लाईन या गाळामुळे काटोकाट भरलेल्या असल्याने त्या पावसाळ्यापूर्वी साफ न झाल्यास पावसाळ्यात लोकांच्या घरात मैला मिश्रित दूषित पाणी घरात शिरते त्यामुळे अनेक प्रकारच्या साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावर प्रशासनाकडून पावसाळ्याच्या अगोदर काम पूर्ण होणे जरुरीचे आहे.

शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे नाहक त्रास होत आहे. यावर प्रशासनाकडून योग्य कारवाई व्हावी. पिंपरी चौक येथील बीआरटी मार्गामध्ये दिनांक ०३/०२/२०२२ रोजी कै. राम जनम विश्वकर्मा, वय २७ वर्षे या युवकाचा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे जीवास मुकावे लागले. सदरील अपघातस्थळी प्रशासनाकडून कोणत्याही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेल्या युवकास कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. या झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करून मयत युवकाच्या कुटुंबास आर्थिक मदत करावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: