तालुका व जिल्हा न्यायालयात १२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

पुणे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाने विधी सेवा प्राधिकरण अधिनियमातील तरतुरदीअंतर्गत जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १२ मार्च २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक अदालतीत वाद प्रकरणांचा झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा-उलटतपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. तसेच लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही आणि एकाच निर्णयात न्यायालयीन प्रक्रियेतून कायमची सुटका होते. लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजूतीने होत असल्याने सर्व पक्षाचा विजय होतो, द्वेषभावना वाढत नाही आणि निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो.

लोक न्यालयालात परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणेच लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते. लोक न्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार शुल्काची रक्कम परत मिळते.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची दिवाणी प्रकरणे, चेक बाउन्स प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज, पाणी व कर यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, नोकरीबाबतची प्रकरणे ज्यात पगार, इतर भत्ते व निवृत्तीबाबतचे लाभ  तसेच महसूल बाबतची प्रकरणे ठेवण्यात येतात.

लोक न्यायालयात सामोपचाराने वाद मिटविण्याची इच्छा असलेल्या पक्षकारांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे अथवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे त्वरीत संपर्क साधावा. भ्र. क्‌र. ८५९१९०३६१२ वर किंवा dlsapune2@gmail.com या ईमेल पत्त्यावरही संपर्क साधता येईल, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी कळवले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: