fbpx

जेसीबीच्या खोदकामात दोन वीजवाहिन्या तोडल्याने कोंढव्यातील वीजपुरवठा खंडित

पुणे : येवलेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याने कोंढवा व पिसोळी परिसरातील सुमारे ९ हजार ग्राहकांना बुधवारी (दि. ९) सुमारे ८ तास खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. संपूर्ण स्विचिंग स्टेशन बंद पडल्याने या कालावधीत पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध होऊ शकली नाही.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या कोंढवा परिसरातील शोभा स्विचिंग स्टेशनला महापारेषणच्या २२० केव्ही उच्चदाब उपकेंद्रातून २२ केव्हीच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र येवलेवाडी कमानीजवळ रस्त्याच्या बाजूला रुंदीकरणासाठी जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात बुधवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. वीजवाहिन्या तोडल्याचे लक्षात येताच संबंधित जेसीबीच्या कर्मचाऱ्यांनी या वीजवाहिन्यांवर मातीचा भराव टाकला व पसार झाले.

मात्र दोन्ही वीजवाहिन्या तोडल्यामुळे शोभा स्विचिंग स्टेशनचा वीजपुरवठा पूर्णतः बंद पडला. परिणामी कोंढवा खुर्द व बुद्रुक तसेच पिसोळी परिसरातील सुमारे ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तात्काळ बिघाड शोधणे सुरु केले. यामध्ये जेसीबीच्या खोदकामात दोन्ही वीजवाहिन्या तोडल्याचे आढळून आले. या वीजवाहिन्यांना जाईंट लाऊन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. सायंकाळी ६.३० च्या सुमारास एका वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास गेले होते. त्याद्वारे सर्वप्रथम शोभा स्विचिंग स्टेशनचा वीजपुरवठा पूर्ववत करून रात्री ७ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु होते. दरम्यान खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: