राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शहाराध्यक्षांसाह 30 जणांवर गुन्हा दाखल
पुणे:राज्यपालांच्या नावाने घोषणाबाजीकरून आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रार देण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने उशीरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांचे म्हणणे असून, पालिकेतर्फे तक्रार देण्याची अपेक्षा असताना ती दिली गेली नसल्याचेही म्हटले आहे.
याप्रकरणी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, महेश हांडे, दिपाली धुमाळ यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई ज्ञानेश माने यांनी तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात (२८ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप व पक्षातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपा इमारतीत जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रोखले गेले. परंतु, त्यांनी तरीही इमारतीत घुसून जुन्या इमारतीच्या पायऱ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाने घोषणाबाजी केली. तसेच, आंदोलन केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तत्पुर्वी आंदोलनाबाबत पोलीस विभागाची परवानगी घेतली गेली नव्हती.
दरम्यान, ही वास्तू पुणे मनपाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार द्यावी की पोलीस विभागाने तक्रार द्यावी, असा संभ्रम निर्माण झाला. पालिकेकडूनच तक्रार देणे अपेक्षित असतानाही त्यांनी तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलीसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केली. त्यानंतर पोलीस विभागातर्फे तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे, असेही पोलीसांनी म्हटले आहे.
