Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

समाजधारणेत स्त्री -पुरुषांचे एकत्रित योगदान हवे : निवेदिता भिडे

पुणे : स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढता लढता देह ठेवलेल्या १२ वीरांगनाची स्फूर्तीदायक चरित्रे असलेल्या ‘ समिधा ‘ या पुस्तकाचे प्रकाशन विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभागातर्फे दि. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी, झाले.

शिरीष अंबुलगेकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे . विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पद्मश्री पुरस्कार प्राप्त निवेदिता भिडे ,प्रमुख पाहुण्या स्मिता घैसास (अध्यक्षा, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था), किरण कीर्तने यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन झाले.

यावेळी बोलताना निवेदिता भिडे म्हणाल्या, ‘ भारतीय संदर्भात महिलांविषयीचा विचार मांडण्यासाठी महिला दिनाचे औचित्य उपयुक्त आहे. पुढील पिढयांना महिला कर्तुत्वाच्या प्रेरणांचा इतिहास या पुस्तकातून पुढे येत आहे, ही चांगली गोष्ट आहे. भारतीय स्त्री जीवन कर्तव्याला प्राधान्य देते. मात्र,समाज धारणेत स्त्री -पुरुष दोघांनीही योगदान दिले पाहिजे.

भारताचा ‘ स्व ‘ आपण उच्चारत नाही, ही दुःखदायक गोष्ट आहे. राष्ट्राचे प्रयोजन आपण विसरता कामा नये. हे प्रयोजन आपण जाणून घेतले पाहिजे. राष्ट्र वैभवशाली करायचे आहे. त्यातून विश्वाला मार्गदर्शन होऊ शकते. स्वामी विवेकानंदांचे हे कार्य आपल्याला पुढे न्यायचे आहे. हा विचार विस्मृतीत जाऊ देता कामा नये.

‘धर्म म्हणजे पूजा पाठ नसून सर्वांप्रती आत्मीयता, कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण पार पाडले पाहिजे. धर्माचा अर्थ संकृचित होऊ देता कामा नये ‘. असेही त्या म्हणाल्या.

स्मिता घैसास म्हणाल्या, ‘ इतिहासात दडलेल्या प्रेरक महिलांच्या व्यक्तीरेखा या पुस्तकातून भेटीस येतात. युवा पिढीला देशप्रेम, साहस, संस्कृती समजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इतिहास शिकवताना प्रेरणा शिकवली नाही तर तो निरस वाटून विसरला जातो. प्रत्येक भाषांमध्ये प्रेरक व्यक्तींची , महिलांची कर्तृत्वे लिहिली गेली पाहिजेत. त्या दृष्टीने विवेकानंद केंद्राचे कार्य महत्वाचे आहे.

शिरीष अंबुलगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रेरणांचा इतिहास पुढे आणण्यासाठी हे पुस्तक लिहिण्याचा संकल्प केला होता, असे ते म्हणाले.

विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय सचिव भानुदासजी, आदी मान्यवर सभागृहात उपस्थित होते. प्रास्ताविक शैलेंद्र बोरकर यांनी केले. स्वाती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले,वसुधा करंदीकर यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading