Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

300 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या निर्मितीचे उदिष्ट – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : महिलांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांची महिला बचत गटाच्या माध्यमातून बांधणी करून त्यांचे सक्षमीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिला आरक्षण असल्याने त्यांची प्रगती दिसून येत आहे. मात्र महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढविल्यास आपला भारत देश महासत्ता होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शिक्षणांच्या पुण्यकर्मामुळेच महिला चूल आणि मुलांसह पुरूषांच्या खांद्याला लाऊन कार्य करत आहेत. आता महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढे आल्या असल्याने देशाची प्रगती व्हायला सुरू झाली असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज काढले.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानमार्फत ‘महाजीविका अभियान’ राज्यस्तरीय शुभारंभ आज ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, गृहनिर्माण (ग्रामीण)चे संचालक डॉ.राजाराम दिघे, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सन 2022-23 हे उपजीविका वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय जाहीर केला व त्यामध्ये उपजीविका व विपणन या विषयावर भर देण्यासाठी महाजीविका अभियानाचा शुभारंभ झाला असल्याची घोषणा केली. ग्रामविकासामध्ये महिलांचा विकास हा महत्त्वाचा विषय असून यासाठी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय दृष्ट्या सक्षम करण्याची गरज मंत्रीमहोदयांनी व्यक्त केली. आजमितीस राज्यातील जवळपास 56 लाख कुटुंबे या अभियानात सहभागी असून सुमारे 5 लाख 47 हजार स्वयंसहाय्यता गटांची निर्मिती करण्यात आली आहे. या स्वयंसहाय्यता गटांना आतापर्यंत 12,479 कोटी रूपयांची बॅंक कर्जे आणि अभियानामार्फत 953 कोटी रूपयांचा समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविड काळात उमेद अभियानातील महिलांनी पुढाकार घेऊन मास्क निर्मितीच्या विक्रीतून 11.25 कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत 15 कोटी रूपयांचे बीजभांडवल वितरीत केले असून लवकरच 13 कोटी रूपयांचे वितरण करण्यात येणार आहे. मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत 4 उपप्रकल्प मंजूर असून त्याची किंमत 4.15 कोटी रूपये आहे. याशिवाय 200 उपप्रकल्पाचे उद्दिष्ट असून 300 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या निर्मितीचे उदिष्ट आहे. आता या महाजीविका अभियानातून महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन राज्यातील किमान दहा लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट या अभियानात नक्की केले आहे. अभियान रचनेत काही त्रुटी असल्यास त्या दूर करून सर्व बचत गटांच्या महिलांचे जीवन सुखी व संपन्न करू या, असे मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.

उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर म्हणाले की, कोरोनाच्या कठीण काळात राज्यातील महिला बचत गटांच्या भगिनींनी भूषणावह कामगिरी केली आहे. या महिलांना अधिक प्रोत्साहनासाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी उमेदच्या वतीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी अमेझॉन, फि्लपकॉर्ट अशा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading