सेन्सर टेक्नॉलॉजी प्रदर्शनाला तंत्रस्नेहींचा प्रतिसाद

पुणे: मोठमोठ्या कंपन्यांमध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी, कोडिंगच्या माध्यमातून अनेक वस्तूंचे क्षणार्धात वर्गीकरण करण्यासाठी, वेगवेगळ्या उत्पादनाची क्षमता तपासण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी संवेदनशील तंत्रज्ञान म्हणजेच सेन्सर तंत्रज्ञान वापरण्यात येऊ शकते याचा अनुभव शुक्रवारी विद्यापीठातील सीफोरआयफोर प्रयोगशाळेत अनुभवायला मिळाला.

भारतातील सेन्सर टेक्नॉलॉजी विषयात काम करणाऱ्या नऊ कंपन्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सीफोरआयफोर’ प्रयोगशाळेत प्रदर्शन भरविण्यात आले. ऑटोमेशन इंडस्ट्री असोसिएशनच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीफोरआयफोर प्रयोगशाळेचे संचालक डॉ. दत्तात्रय नवलगुंदकर तसेच अनेक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक लघू व मध्यम उद्योगांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी व तंत्रस्नेहींनी हजेरी लावली होती.

भारतातील लघू व मध्यम उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांना जगातील नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या समर्थ भारत उद्योग उपक्रमांतर्गत ही सीफोरआयफोर प्रयोगशाळा काम करते. या प्रदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यास मदत झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: