मोदींच्या कार्यक्रमाला पुणे महापालिकेतील नगरसेवक राहणार उपस्थित – महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात पुणे महापालिकेतील कार्यक्रमासाठी उपस्थितीचे बंधन घालण्यात आले होते. मात्र, महापालिकेच्या कार्यक्रमाला नगरसेवकांना उपस्थित राहता येणार नसल्याने निर्माण झालेली नाराजी व राजकारण पेटण्याची शक्यता गृहीत धरून उपस्थितीची मर्यादा २५० जणांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदी महापालिकेत आल्यानंतर या पुतळ्याचे लोकार्पण करून १० मिनिटात महापालिकेतून बाहेर पडणार आहेत. महापालिकेत उपलब्ध असलेली जागा व पंतप्रधानांचा ताफा याचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्या २५ ते ३० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम केला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र, पुणे महापालिकेचा कार्यक्रम असल्याने यास नगरसेवकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देणे आवश्यक असते. यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्याही नगरसेवकांना निमंत्रण पाठवले जाते. निमंत्रण देण्यात भेदभाव झाल्यास त्यावरून पुन्हा राजकारण होण्याची नामुष्की ओढवते.
महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने नरेंद्र मोदी महापालिकेत येणार असल्याने यावेळी उपस्थित राहता आले पाहिजे असा आग्रह धरला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेशी चर्चा करून नगरसेवकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू देण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच महापालिकेचे व्यवस्थेतील अधिकारी, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पीकर, सजावट, मांडव यासह इतर कामासाठी असलेले कर्मचारी यांना पास दिले जाणार आहेत. असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
महापालिकेच्या कार्यक्रमाला नगरसेवकांना उपस्थित राहता आले पाहिजे.त्यामुळे उपस्थितीचे बंधन कमी केले आहे. नगरसेवक, अधिकारी व कार्यक्रमाशी संबंधित कर्मचारी असे सुमारे २०० ते २५० जणांचे स्वतंत्र पास असतील, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.
