राज्य सरकार सूड भावनेने राजकारण करत आहे – प्रवीण दरेकर
पुणे : शिवसेनेच्या संजय राठोड यांच्यामुळे निष्पाप मुलीला आत्महत्या करावी लागली. ती केस दाबली गेली. हा सत्तेचा गैरवापर आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केल्यावर त्यांच्या विरोधात अटकेचे वॉरंट काढले. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला. तरी कारवाई नाही. सध्या राज्य सरकार सूड भावनेने राजकारण करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.
नैतिकतेच्या मुद्द्यावर याआधी महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आता ठाकरी बाणा कुठे गेला त्यांना पटत असेल. पण बोलणार कसे? असं प्रविण दरेकर म्हणाले. ‘राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तर सत्तेचे काय होणार. त्यामुळे मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. नवाब मलिक देशभक्त असल्याप्रमाणे आव आणला जात आहे, असेही दरेकर यावेळी म्हणाले. तसेच राज्यात अनेक ठिकाणी पोलिस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
नवाब मलिक जणू काही साधू, संत, अहिंसेचे पुजारी असल्यासारखे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारने आंदोलन केले. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
