fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

हजारो तास अंधारात काढणाऱ्या महाराष्ट्रारातील वीज ग्राहकाला दिलासा कधी मिळणार? – विवेक वेलणकर

पुणे : काल मुंबईत तांत्रिक बिघाडामुळे सव्वा तास वीजपुरवठा खंडित झाला आणि आपण त्याची तातडीने दखल घेतली आणि उच्चस्तरीय चौकशी चे आदेश देऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. मात्र उर्वरित महाराष्ट्रात वर्षानुवर्षे दर महिन्याला तांत्रिक बिघाडामुळे हजारो तास कोट्यवधी ग्राहकांना अंधारात बसावे लागत आहे. त्यावर कधी उपाययोजना होणार? असा सवाल सजग नागरीक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना विचारला आहे.

यासंदर्भात राऊत यांना लिहिलेल्या पत्रात वेलणकर म्हणतात की, डिसेंबर २०२१ चा चार्ट बघता असे दिसते की, या महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या १४९३७ घटना घडल्या. ज्यामधे राज्यातील अडीच कोटी हून अधिक ( २,७८,७३,५३०) नागरिकांना एकूण ५२५०८ तास अंधारात बसावे लागले. महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पुणे झोनची अवस्था काही वेगळी नाही. डिसेंबर २०२१ मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या १०९९ घटना घडल्या ज्यात पुणेकरांना ५४९६ तास अंधारात बसावे लागले. दर महिन्याला हा चार्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे महावितरणसाठी बंधनकारक आहे. मात्र चार चार महिने हे चार्ट प्रसिद्ध होत नाहीत. गेले वर्षभर दरवेळी मी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली की मगच हे चार्ट प्रसिद्ध केले जातात.

महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या ६ वर्षांचे चार्ट उपलब्ध आहेत ते पाहता तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार उर्वरित महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे स्पष्ट दिसून येते. या अचानक होणाऱ्या बिघाडा व्यतिरिक्त देखभाल दुरुस्तीसाठी आठवड्यातून एक दिवस ( पुण्यात गुरुवारी) काही तासांचा नियोजनबद्ध अंधार आणि ग्रामीण भागातील भारनियमनामुळे होणारा अंधार वेगळाच. या पार्श्वभूमीवर, मुंबई प्रमाणेच उर्वरीत महाराष्ट्रातील जनतेची पण तांत्रिक बिघाडामुळे होणार्‍या अंधारापासून सुटका करावी, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading