कृतीशील जीवनाचा संस्कार आईने बिंबवला – विद्याधर अनास्कर
पुणे:- प्रचंड टोकाचे कष्टप्रद जीवन जगत असतांना संस्कारांना जागून जीवन व्यथित करणे कठीण असते. परंतु, अशा कठीण प्रसंगीच माणसाची आणि त्याच्या मनोवृत्तीची कसोटी पणाला लागत असते. आमची आई या कसोटीवर शंभर टक्के खरी उतरली आणि कृतीशील जीवनाचा हा संस्कार आमच्या मनावर तिने कायमस्वरूपी बिंबवला, अशा भावना महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केल्या.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एका कर्तबगार मातेस दिला जाणारा आदर्श आई पुरस्कार यंदा श्रीमती अनसूया अनास्कर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्यांच्यावतीने त्यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोश, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप या ‘थिंक टँक’चे सिनिअर प्रोग्राम अॅडव्हायजर सचिन ईटकर, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी बोलताना विद्याधर अनास्कर म्हणाले की, आज मिळालेला हा पुरस्कार मी लिज्जत संस्थेला अर्पण करीत आहे. निघोजकर मंगल कार्यालयापासून चार ते पाच भगिनींसोबत सुरू झालेला हा प्रवास आईच्या नेतृत्व गुणांमुळे आज यशोशिखरावर विराजमान झालेलाआहे. लिज्जत ही संस्था मला मातृस्थानी असून तिथे मला आईच्या छायेचा आभास होतो. माझी आई हीच माझी गुरू होती की जिने मला कृतीतून आणि वर्तनातून घडवले.
यावेळी बोलताना डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, विठ्ठलाच्या गाभा-यात जन्मलेला हा बाळकृष्ण उच्च विद्याविभूषीत व्हावा म्हणून वडिलांनी त्याचे नाव विद्याधर ठेवले. या विद्याधराने बाळकृष्ण आणि विद्याधर ही दोन्ही नावे सार्थकी लावली. कणखर आणि करारी आईच्या पदरी जन्म घेतलेल्या विद्याधर अनास्कर यांनी तोच बाणा स्वतःमध्ये रूजवला आहे. पुणे रेल्वे स्टेशन समोरील धर्मशाळेत अतिशय कष्टप्रत आणि हालाखीचे जीवन कंठीत सुरू झालेला अनास्कर कुटुंबियांचा हा प्रवास आई या एका दीपस्तंभामुळे सुखकर झाला.
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, लिज्जत पापड हा केवळ उद्योग समूह नसून ते एक श्रमाचे मंदिर आहे. अनसूया अनास्कर यांच्या पुढाकारामुळे आणि कार्यामुळे त्याला मंदिराचे पावित्र्य प्राप्त झाले आहे. आजी आजोबा ही संस्कारपीठे घरात राहिलेली नाहीत. अशा काळात आजही विद्याधर अनास्कर मातृश्रद्धा बाळगून आहेत, हा त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा भाग आहे. खरेतर मातृदेव भवः, पितृदेव भवः आणि आचार्य देव भवः ही आपली भारतीय संस्कृती असतांना आई वडिलांना सांभाळण्यासाठी आज कायदे करावे लागत आहेत. हा आपल्या संस्कृतीचा पाया ढासळत असल्याचा संकेत आहे. कुटुंबसंस्था डळमळीत होत आहे, हे धोक्याचे लक्षण आहे.
सचिन ईटकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
