जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेली पाणी दरातील दरवाढ रद्द करावी – जगदीश मुळीक
पुणे : सलग दोन वर्षे उत्तम पाऊस पडल्याने पाणीकपातीचे संकट दूर होते आहे असे वाटत असतानाच जलसंपदा विभागाचा पाणीदरात प्रचंड वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारच्या अनागोंदी कारभाराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर टाकण्याचा हा प्रकार आहे, असे सांगत भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेली पाणी दरातील दरवाढ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
याविषयी मुळीक यांनी जलसंपदा विभागास पत्र पत्र लिहिले आहे. यामध्ये मुळीक यांनी म्हणाले आहे की, जलसंपदा विभागाने महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांना दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या दरामध्ये पाचपट वाढ प्रस्तावित केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाणीसाठा समाधानकारक असून तसेच तो वाढावा यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च होत नसताना प्रस्तावित केलेली दरवाढ हे अनाकलनीय आहे. कोरोनाच्या महामारीच्या प्रचंड मोठ्या संकटाला संपूर्ण जनता तोंड देत असताना सर्वसामान्यांना दिलासा ज्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने हा अन्याय कारक प्रस्ताव त्वरित मागे घ्यावा. अन्यथा या अन्यायकारक निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाला तीव्र आंदोलन करेल.
