गंगाधर स्वरोत्सवात केडिया बंधुंचे सहवादन
पुणे : ‘स्वरनिनाद’तर्फे आयोजित ‘गंगाधर स्वरोत्सव’चा दुसरा दिवस पंडित मनोज केडिया आणि मोरमुकूट केडिया यांच्या सरोद आणि सतार सहवादनाची पर्वणी ठरला. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे हा कार्यक्रम होत असून संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा यात सहभाग आहे.
पं. गंगाधर पिंपळखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित सातवा गंगाधर स्वरोत्सव सध्या सुरू आहे. या स्वरयज्ञाचा दुसऱ्या दिवसाची सुरुवात मनोज केडिया आणि मोरमुकूट केडिया यांच्या सरोद आणि सतार वादनाने रसिकांची मने जिंकली. ‘राग झिंझोटी’ने वादनाला सुरुवात करीत केडिया बंधूंनी समा बांधला. त्यानंतर खमाज रागमध्ये ‘वैष्णव जन तो’ वादन केले. त्यांना रामदास पळसुले यांनी तबला साथ केली.
दिवंगत ज्ञानेश्वर पिंपळनेरकर यांच्या पत्नी कुंदा पिंपळनेरकर यांच्या वतीने पं. गंगाधर पिंपळखरे यांच्या स्मरणार्थ ‘ज्ञानदा पुरस्कार’ यंदापासून देण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रात निष्ठने ज्ञानदानाचे काम करणाऱ्या गुरुला हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यंदाचा पुरस्कार पं. विजय बक्षी यांना जाहीर झाला. लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते पं. विजय बक्षी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गायिका मंजुषा पाटील आणि अभिनेते सुरेश भागवत यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.
यानंतर दुसऱ्या सत्रात अमोल निसळ यांचे शास्रीय गायन झाले. निसळ यांनी राग बिहागने सादरीकरणाला सुरुवात केली. ‘चिंता ना कर रे’ ही बिहागमधील बंदिश त्यांनी गायली. तसेच ‘लाट उलझाई सुलझाई बालम’, ‘आई रे अलबेली’, ‘मोरा मदनमोहन मोहें आन’ या रचना त्यांनी सादर केल्या. ‘बाजे रे मुरलिया बाजे’ या भारतरत्न पं. भीमसेन जोशींच्या गीताने दुसऱ्या दिवसाची सांगता केली. निखिल फाटक (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी) आलापिनी निसळ, शार्दूल काणे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
