‘स्वरनिनाद’तर्फे ‘गंगाधर स्वरोत्सव २०२२’चे आयोजन
पुणे : ‘स्वरनिनाद’तर्फे ‘गंगाधर स्वरोत्सव २०२२’ या तीन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. मुक्तांगण बालरंजन केंद्र, सहकारनगर, पुणे येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास सशुल्क प्रवेश आहे.
पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मरणार्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष असून याआधी अनेक दिग्गज कलाकारांनी या व्यासपीठावर आपली कला सादर केली आहे. यंदादेखील गायन आणि वादन क्षेत्रातील नामवंत मंडळी सादरीकरण करणार आहेत. १८ फेब्रुवारी कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आनंद भाटे यांचे गायन होणार असून यशवंत वैष्णव यांचे एकल तबला वादन सादर होईल.
१९ फेब्रुवारी रोजी केडिया बंधु म्हणजेच मुकुट केडिया आणि मनोजकुमार केडिया यांचे सरोद आणि सतार यांचे सहवादन होईल. तसेच अमोल निसळ हे गायन सादर करतील. २० फेब्रुवारी रोजी मंजिरी असनारे यांचे गायन होणार असून रोणू मुजुमदार यांचे एकल बासरीवादन होईल.
