‘डिस्को किंग’ ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन
मुंबई : संगीत क्षेत्रात गोल्डन मॅन आणि डिस्को किंग अशी त्यांची ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे आज निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जवळपास पाच दशके त्यांनी आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर अधिराज्य केले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बप्पी लाहिरी यांचे Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लेहरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेली 29 दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं.
आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. 1973 मध्ये ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदार्पण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या ‘उ लाला’ हे गाणंही चांगलंच लोकप्रिय झालं होतं. 2021 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.
