विद्यापीठातील वसतीगृह स्थानिक प्रशासनाच्या परवानगीच्या कचाट्यात?
पुणे: कोवीड १९ च्या प्रदीर्घ प्रादुर्भावानंतर विद्यापीठ परिसर पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरू झाला आहे. मात्र, वसतीगृह अद्यापही विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेली नसून, विद्यार्थ्यांसमोर राहण्याचा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
विद्यापीठात अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पुन्हा विद्यापीठात उपस्थित राहण्याकरिता वसतीगृहाची नितांत गरज आहे. परंतु, वसतीगृह अद्यापही विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. यामुळे, विद्यापीठात ऑफलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या राहण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ही गोष्ट निदर्शनास आणून देत प्रशासनाने तात्काळ वसतीगृह सुरू करून ग्रामीण भागातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अभाविप पुणे महानगराच्या वतीने कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडे करण्यात आली .
अभाविप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेच्या वतीने याआधी देखील संबंधित विषयात वारंवार विद्यापीठात निवेदन देण्यात आले. मात्र त्यावर कोविड प्रादुर्भावामुळे कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. विद्यापीठाकडून स्थानिक प्रशासनाला परवानगी चे पत्र पाठवले असून, परवानगी लवकरच मिळेल व २ ते ४ दिवसात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह खुले करण्यात येतील. विद्यापीठ प्रशासनाकडून वसतीगृह सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, स्थानिक प्रशासन परवानगी अभावी उशीर होत आहे. परवानगी मिळताच वसतीगृह सुरू होतील. तसेच, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पैसे भरून पावती वसतीगृह प्रशासनाकडे दिल्यास त्यांना त्यांच्या रूमचा ताबा दिला जाईल, असे कुलगुरू व विद्यापीठ वसतीगृह प्रशासनाने अभाविप च्या शिष्ट मंडळाला सांगितले.
यावेळी अभाविप पुणे महानगर चे वसतीगृह संपर्क प्रमुख सूरज गूत्ती, नवनाथ कावळे व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
