Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पर्यावरणासाठी सक्षम राजकीय नेतृत्वाची गरज – डॉ. माधव गाडगीळ

पुणे : पर्यटनासाठी केवळ निसर्ग राखून ठेवावा, अशी भावना असू नये. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस केला जात आहे. यामुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी सक्षम राजकीय नेतृत्वाची गरज आहे. असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

वनराई फाउंडेशन तर्फे दिला जाणारा स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार-२०२२ डॉ. गाडगीळ यांना खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते. खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, वनराई फाउंडेशन नागपूर अध्यक्ष गिरीश गांधी, वनराई ट्रस्ट पुणे अध्यक्ष रवींद्र धारिया, अमित वाडेकर, नीलेश खांडेकर, समीर सराफ, रोहिदास मोरे, सागर धारिया, डॉ. सतीश देसाई, अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रोख एक लक्ष रुपये, शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘‘लोकांना जगण्यासाठी विकास हवा आहे. मात्र विकासाच्या नावाखाली त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. रस्‍त्याची कामे होत असताना निसर्गाचा विचार केला जात नाही. डोंगर खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे दरडी कोसळत आहेत. हा विकास लोकांना मारण्यासाठी होत आहे असे वाटते. देशात एकेकाळी २० टक्के भाग पर्यावरणासाठी राखून ठेवावी. अशी लोकांची भावना होती. देवराई बद्दल लोकांची अंधश्रद्धा होती, मात्र त्यामागे झऱ्यांचे नैसर्गिक झरे, जैवसंपत्ती टिकून राहते, हा विचार होता”.

टेकड्या वाचाव्यात अशी पुणेकरांची आग्रही मागणी होती. यासाठी ८६ हजार पत्र सरकारला पाठवण्यात आले होते. यासाठी एक राजकीय पाठिंबा म्हणून डॉ. मोहन धारिया यांनी पाठिंबा दिला होता. अशी आठवण यावेळी डॉ. गाडगीळ यांनी सांगितली. तसेच मिझारोम, मणिपूर, मेघालय या राज्यात आधुनिक व्यापारी प्रवृत्तीचा शिरकाव होण्यापूर्वी तेथील पर्यावरणाची स्थिती सुरक्षित होती. आपला शेजारील भूतान या देशाला हिमनगांचा मोठा धोका आहे.  मात्र तेथे अजूनही २० टक्के भागात देवराई सुरक्षित आहे. तेथील राजकीय नेते संवेदनशील आहेत. असेही त्‍यांनी सांगितले.

सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. प्रस्ताविक गिरीश गांधी यांनी केले. आभार खांडेकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading