Friday, June 5, 2026
Latest NewsSports

आझम महिला क्रिकेट टी-२०स्पर्धा – मेट्रोइट्स, जनादेश संघाची आगेकूच कायम

पुणे : मेट्रोइट्स संघाने पीएमपी संघाला तर जनादेश संघाने ए के स्पोर्ट्स संघाला पराभूत करताना आझम महिला टी – २० क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.  

मेट्रोइट्स संघाने पीएमपी संघाला ३१ धावांनी पराभूत केले. संजूला नाईकच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मेट्रोइट्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद ११६ धावांपर्यंत मजल मारली. संजूला नाईकने ३० चेंडूत ८ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ५३ धावांची खेळी केली. तिला श्रेया परब हिने २४ (४ चौकार) धावा, इब्तीसम शेख हिने १२ (२ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. भोगी सर्वानी व प्रिया कोकरे यांनी प्रत्येकी २ तर चिन्मयी बोरफळे हिने एक गडी बाद केला.

मेट्रोइट्स संघाचे आव्हान पीएमपी संघाला पेलवले नाही. पीएमपी संघ १९.२ षटकांत सर्वबाद ८५ धावाच करू शकला. श्वेता जाधव हिने २३ (३ चौकार) तर वैष्णवी काळे हिने २० (१ चौकार) करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. मिताली गावंदर, श्रेया परब, पूर्वा भईडकर व संजूला नाईक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अर्धशतक व २ गडी बाद करण्याऱ्या मेट्रोइट्सच्या संजूला नाईकला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या लढतीत जनादेश संघाने ए के स्पोर्ट्स संघाला ६२ धावांनी पराभूत केले. भूमिका उंबरजेच्या दमदार आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जनादेश संघाने निर्धारित २० षटकांत २ बाद १४७ धावसंख्या उभारली. भूमिका उंबरजेने केवळ ६५ चेंडूत १२ चौकारांच्या सहाय्याने ८१ धावा करत मोठी धावसंख्या उभाली. तिला श्री राठोडने ३१ (५ चौकार) तर तेजल हसबनीसने १६ धावा करताना सुरेख साथ दिली. अनन्या दर्शाळेने एक गडी बाद केला.

ए के स्पोर्ट्स संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद ८५ धावा करता आल्या. ए के स्पोर्ट्स संघाकडून अनन्या दर्शाळेने सर्वाधिक २४ धावांची (४ चौकार) खेळी केली. तिला भाविका अहिरेने २१ (३ चौकार) धावा करताना दिलेली लढत अपुरी ठरली. जनादेश संघाच्या श्रुती महाबळेश्वर हिने ३ गडी बाद करताना संघाला विजय मिळवून दिला. तिला तनुजा भोसले हिने २, भूमिका उंबरजे, तेजल हसबनीस व इशा पठारे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. जनादेश संघाच्या भूमिका उंबरजे हिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading