बोल सहेली, खुल के बोल,बोल सहेली, जोर से बोल!!
पुणे: आत्तापर्यंत महिलांवरील हिंसा म्हटल्यावर छेडछाड, कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी वगैरे डोळ्यासमोर येत होत्या पण आता महिलांवर होणाऱ्या हिंसेचे नविन रूप – ऑनलाईन हिंसा/ट्रोलिंग, ‘बुल्ली बाई’ आणि ‘सुल्ली डील्स’ सारख्या ॲपद्वारे मुस्लिम महिलांची ऑनलाईन विक्री करणे इ.– मानसिक खच्चीकरण करून मनात भीती निर्माण केली जात आहे. संविधानाची पायमल्ली करत आता हिजाब घालणाऱ्या मुलींना शिक्षण नाकारण्यात येत आहे. या सर्व हिंसाचाराविरोधत आपल्याला रस्त्यावर उतराव लागेल असे परखड मत अभिव्यक्तीच्या अलका जोशी यांनी मांडले. अभिव्यक्ती, वारसा सोशल फाउंडेशन, सखी सहेली महिला मंडळ आयोजित वन बिलियन रायझिंग कार्यक्रम. दरवर्षीप्रमाणे हिंसामुक्त आणि न्यायपूर्ण समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन सर्वांना करत हा कार्यक्रम संभाजी उद्यानाबाहेर झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
हे रस्ते आमचे आहेत म्हणत आम्ही बिनधास्तपणे रस्त्यावर नाचत-गात-ढोल वाजवत महिलांवर होणार्या हिंसेचा विरोध करत आहोत. हिंसेला उत्तर प्रेमानेचं दिलं जाऊ शकतं. म्हणून प्रेमाच्या दिवशी हा कार्यक्रम करतो असं वारसा सोशल फाऊंडेशनचे प्राची दुधाने म्हणाल्या. समाजामध्ये जात–धर्म–वर्ण यांच्या नावाने होणारी हिंसा-दंगली, दलितांवरील अत्याचार, कामगारांची पिळवणूक, व्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्ली या सर्वांच्या विरोधात बोललं पाहिजे अशा भावना सखी सहेली मंडळाच्या आरती नाईक यांनी मांडल्या.
कार्यक्रमात तरुणाईचा उस्फूर्त प्रतिसाद होता. महिलांनीच ढोल, ताशे वाजवत महिला शक्ती आयी है नई रोशनी लायी है घोषणा देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. इरादे कर बुलंद, तोड तोड के बंधनो को ही गाणी गायली गेली. तसेच फ्लॅश मॉब डान्स, कवितांचं सादरीकरण ही करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, मराठा महासेवा संघाचे सचिन आडेकर, संयुक्त स्त्री संस्थेच्या अंजली सोलापूरे, छावा संघटनेच्या प्रतिभा शिंदे, सीमा महाडिक, अनुसया गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी केले. तर आभार श्रध्दा रेखा राजेंद्र यांनी मांडले.
