Saturday, July 18, 2026
Latest NewsPUNE

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून राहुल बजाज यांना श्रद्धांजली अर्पण

महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र हे संपूर्ण देशातील प्रमुख क्षेत्र आहे. राज्याला हे स्थान मिळण्यामध्ये उद्योगपती राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगसमुहामार्फत केलेले काम खूप मोलाचे आहे. बजाज ऑटोचे पन्नास वर्षे नेतृत्व करून त्यांनी त्या कंपनीला यशाच्या शिखरावर नेले. पुणे – पिंपरी चिंचवड हा परिसर औद्योगिकदृष्ट्या प्रगत झाला आणि येथे समृद्धी निर्माण झाली यामध्ये बजाज ऑटोचे ऐतिहासिक स्थान आहे. राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगताची अपरिमित हानी झाली आहे.

  • चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप 

देशाच्या औद्योगिक विकासात बजाज उद्योग समुहाचा वाटा मोठा असून त्यात राहुल बजाज यांचे भरीव योगदान होते. त्यांनी बजाज उद्योग समुहाची पुण्यात उभारणी करुन अनेक लघुउद्योजकांना वाव दिला आणि असंख्य कामगारांना रोजगार देऊन त्यांचे आयुष्य घडविले. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही बजाज कुटुंबाचा सहभाग होता. जमनालालजी बजाज हे महात्मा गांधींचे सहकारी होते. महात्मा गांधींकडून प्रेरणा घेऊन बजाज परिवार देशसेवेत सदैव कार्यरत राहिला आहे.

तब्बल पाच दशकं बजाज उद्योगपती समुहाचे नेतृत्व करणाऱ्या राहुल बजाज यांना श्रद्धांजली!

  • मोहन जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माजी आमदार.

राहुल बजाज (अंकल) यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झाले आहे. माझे वडील पी. पी. छाब्रिया यांचे ते खास मित्र होते. त्यांची ही मैत्री आमच्या तीन पिढ्यांशी आणि कुटुंबाशी जोडलेली आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझे व्यक्तिगत किंवा उद्योग जगताचेच नाही, तर राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. आयुष्यभरात त्यांनी केलेल्या कार्याची यादी मोठी आहे. दूरदर्शी आणि कल्पनारम्य अशा रिक्षाची निर्मिती करून सामान्य माणसाला सक्षम बनवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचा जगभर आदर केला जातो. उद्योगसह सामाजिक कार्यात त्यांचे योगदान प्रेरक आहे. माझी पत्नी रितू ही देखील त्यांच्या सामाजिक कार्याने प्रभावित झाली. त्यांच्याशी झालेला प्रत्येक संवाद मौल्यवान, आनंददायी आणि नवीन काहीतरी शिकवणारा होता. त्यामुळे त्यांचे जाणे वेदनादायी आहे. मला अनेक प्रसंगात काही अडचणी आल्या तर त्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांच्याकडे जात असे. त्यांच्यामुळे माझ्या विचारसरणीत, प्रगतीत भर पडली आहे. त्यांनी आपल्या औद्योगिक आणि सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा मागे ठेवला आहे. त्यांचा हा वारसा राजीव आणि संजीव दोघेही पुढे घेऊन जातील, अशी अपेक्षा आहे.

– प्रकाश पी. छाब्रिया, चेअरमन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज

आजचा दिवस अतिशय दुःखद आहे. राहुल बजाज यांचे जाणे आपल्या सर्वांसाठीच वेदनादायी आहे. ते केवळ पुण्याचेच नाही, तर देशाचे भूषण होते. उद्योग क्षेत्रातील उत्तम नेतृत्व, मार्गदर्शक आणि पितामह हरवला आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय होते. उद्योगसह सामाजिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच मी अधिक प्रभावित झाले होते.

– रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग जगताचे आणि देशाचेही खूप मोठे नुकसान आहे. भारतीय वाहन उद्योगाला नवा आयाम देणारा द्रष्टा उद्योगपती हरपला. उद्योग क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणारे आणि दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून बजाज यांची ओळख होती. उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांच्याकडे कमालीचे सामाजिक भान होते. आदर्श उद्योजक आणि समाजसेवक गमावल्याची भावना आहे.

– राजेश राठी, व्यवस्थापकीय संचालक, सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज

ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रातील एक तेजस्वी तारा लुप्त झाला आहे. ते समाजाभिमुख उद्योजक आणि जनसामान्यांनी आपुलकीने ‘हमारा बजाज’ म्हणावे असे व्यक्ती होते. एकेकाळी चारचाकी सोडाच पण दुचाकीही मध्यमवर्गापासून लांब होती. बजाज यांनी त्यांचे स्वप्न साकार केले आणि देशातील वाहन उद्योगात क्रांती घडवली. एक छोटासा उद्योग मेहनत व दूरदर्शीपणाने हजारो कोटींची उलाढाल करणारा आंतरराष्ट्रीय समूह बनवला. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला नम्र आदरांजली

– अल अदील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading