हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप
मुंबई : नागपूरच्या हिंगणघाट येथे बरोबर दोन वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात तरूण प्राध्यापिकेला जीवंत जाळल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षाच्या वतीने युक्तीवाद करताना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. मात्र आज न्यायालयाने ही घटना दुर्दैवी असली तरी दुर्मिळ घटना म्हणता येणार नाही, असे सांगत आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी काम पाहिले.
आम्हाला न्याय मिळाला नाही
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील मृत पीडितेच्या पालकांनी न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही न्यायालयाचा आदर करतो. परंतु आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती. आम्हाला न्याय मिळाला नाही” अशी प्रतिक्रिया पीडितेच्या पालकांनी दिली आहे.
हिंगणघाट जळीतकांडांची नेमकी घटना काय आहे?
3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून तरूण प्राध्यापिकेला भर रस्त्यात पेट्रोल टाकून पेटवले होते. यांत गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित प्राध्यापिका तरुणीचा उपचारादरम्यान 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्यू झाला होता. आज पीडितेचा दुसरा स्मृतिदिन आहे. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी होत होती. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
