fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

गणेशस्तुतीच्या मंगल स्वरांत ‘दगडूशेठ’ मंदिरात गणेशजन्म सोहळा

पुणे : पार्वतीच्या उदरी गणेश जन्मला…बाळा जो जो रे… च्या मंगल स्वरांत पाळणा म्हणत महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभाग घेत गणेशाचरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात दुपारी १२ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशजन्म सोहळा संपन्न झाला. मंदिरावर केलेली कामधेनू प्रतिमांची आणि विविधरंगी फुलांची आकर्षक आरास अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत आरोग्यसंपन्न भारताकरीता गणेशचरणी प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने माघ शुद्ध चतुर्थीला विनायक अवतार असलेला गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात सिद्धार्थ गोडसे, तन्वी गोडसे यांसह शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने, मालन चव्हाण यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण यांसह कार्यकर्ते देखील उपस्थित होते. अर्चना भालेराव, सुवर्णा इनामदार, राधिका बावकर, संध्या अवचट, हेमलता डाबी यांनी गणेश गीत, गणेश जपमाळ, गणपतीचा गजर, अथर्वशिर्ष म्हटले.

शुक्रवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रख्यात गायक अवधूत गांधी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. स्वराभिषेकातून हरिनामाचा गजर, अभंग, भजन, गोंधळातील गण, शाहिरी गण, गोंधळ, गवळण, जुगलबंदी आणि भैरवी या विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळाली. सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग पार पडला.

नगरप्रदक्षिणा सायंकाळी ६.३० वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरापर्यंत चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. तेथे पादुका पूजन झाले आणि गणपती मंदिरात नगरप्रदक्षिणेची सांगता झाली. रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती आणि रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading