Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

कथाकार भारत सासणे यांना राज्य शासनातर्फे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पुणे : उदगीर येथे होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक, कथाकार भारत सासणे यांना आज राज्य शासनाच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कै. विंदा करंदीकर यांच्या नावे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या ज्येष्ठ साहित्यिकास प्रदान करण्यात येतो. मराठी राजभाषा दिनी, दि. 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

पुरस्काराविषयी बोलताना सासणे म्हणाले, दि. 2 जानेवारी 2022 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि बरोबर एक महिन्याने विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याचे वृत्त कळल्यामुळे अतिशय आनंद वाटला. लेखक जे लिहितो, लिहित राहतो त्याची पावती मिळावी, असे प्रत्येक लेखकाला वाटते आणि त्या प्रमाणे ही पावती मिळत गेलेली आहे. विशेषत: तुम्ही जे काही लिहिता, सांगण्याचा प्रयत्न करता ते कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचले याची ही पावती आहे. आता पर्यंत ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळालेले आहेत तोच खरा मोठा गौरव आहे, असे मी मानतो. विंदा करंदीकरांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा श्रेष्ठ पुरस्कार आहे. लेखक म्हणून जे मांडायचे असते ते कधीच संपलेले नसते त्यामुळे ही वाटचाल पुढे चालतच राहिल. साहित्य संमेलनाच्या सर्वोच्च मंचावरून माझे विचार मांडण्यास मी उत्सुक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading