Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

सरकार दरबारी प्रश्न मांडण्याकरीता मंदिरांची संघटना तयार व्हावी

पुणे : धर्मरक्षणात मंदिरांची भूमिका मोठी आहे. मंदिरांमध्ये करोडो नागरिक दर्शनासाठी जातात. त्यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनात अनेक गोष्टी करणे गरजेचे आहे. मंदिराद्वारे उपासनेचा प्रचार होणे देखील आवश्यक आहे. जे भक्त मंदिरात येतात, त्यांच्याशी संवाद साधून त्यातून मंदिराचे कार्यकर्ते उभे राहू शकतात. त्यामुळे मंदिरांना समाजाभिमुख बनविण्याकरीता आणि सरकार दरबारी प्रश्न मांडण्याकरीता मंदिरांची संघटना तयार व्हायला हवी, असा सूर मंदिरांसमोरील समस्या व निवारणाबाबत आयोजित संवाद कार्यक्रमात उमटला.

विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समिती पश्चिम महाराष्ट्रच्यावतीने नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालय येथे सध्याच्या काळात मंदिरांसमोर येणा-या समस्या आणि त्याचे निवारण यासंबंधात विहिंप ची भूमिका याविषयावरील संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे, शनिवार पेठेतील वैभवेश्वर मंदिराचे विनय जोशी, अरुण नेटके, संजय मुरदाळे, मनोहर ओक, सतिश गोरडे यांसह धनंजय चंद्रात्रे, अनिरुद्ध पंडित, श्रीरंग राजे, डॉ. धनंजय बर्वे, डॉ.अनुराधा कुलकर्णी यांसह विविध मंदिरांचे विश्वस्त व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

मिलिंद परांडे म्हणाले, मंदिरे ही सरकारच्या ताब्यात असावी, ही संकल्पना ब्रिटीशांनी आणली. आज अनेक राज्यातील मोठी व संपन्न मंदिरे सरकारी कब्जात गेली आहेत. खरे तर मंदिरांचा सांभाळ हा समाजाने करायला हवा. आज नवी मंदिरे बांधण्याचा उत्साह आहे, मात्र जुन्या मंदिरांकडे पाहणारे कोणी नाही. त्यामुळे मंदिर व्यवस्थानाकडे लक्ष देत ती लोकाभिमुख बनविण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

विनय जोशी म्हणाले, मंदिरांचे जतन, व्यवस्थापन, संवर्धन हे चांगल्या पद्धतीने व्हायला हवे. मंदिरांनी समाजासोबतचे नाते घट्ट करायला हवे. घरातील देव्हा-याप्रमाणे मंदिरांची काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

अरुण नेटके म्हणाले, जागरण, आस्था, श्रद्धा, शक्ती व प्रचार केंद्र म्हणून मंदिरांकडे पाहिले जाते. मंदिरात येणा-या जनतेला चांगला मार्ग दाखविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आपल्या परंपरेचा साक्षात्कार त्यांना होणे, हे मंदिरांचे उद््दीष्टय असायला हवे. मंदिर हे धर्माचे अधिष्ठान व केंद्र आहे. त्यामुळे प्रशासनाने नव्हे, तर समाजाचे मंदिरांचे संचलन करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

मनोहर ओक म्हणाले, मठ मंदिर संपर्क समिती सातत्याने मंदिरांची उभारणी, व्यवस्थापन आणि त्यामधील पवित्रतेची जोपासना करणारे उपक्रम राबवित असते. कोविडच्या काळात मंदिरांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ते प्रश्न व अडचणी यासंदर्भात चर्चा व्हावी, तसेच विश्व हिंदू परिषदेची याबाबतची भूमिका याविषयी या संवाद कार्यक्रमात चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितले. सतिश गोरडे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading