fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

महापालिका व स्मार्ट सिटीची निकृष्ट व अर्धवट कामे पाहण्यासाठी पिंपळे गुरवचा दौरा करावा

शामभाऊ जगताप यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

पिंपरी : पिंपळे गुरवमधील नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो, अशी अर्धवट, निकृष्ट दर्जाची कामे करून विद्यमान लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून नागरिकांच्या कररूपी पैशाचा चुराडा केला जात आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पिंपळे गुरवचा दौरा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भातील निवेदन शामभाऊ जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल आदी उपस्थित होते.
शामभाऊ जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरव परिसरातील मोरया पार्क, साठ फुटी रस्ता, पिंपळे गुरव बसस्टॉप, काशीद पार्क, जवळकर नगर, देवकर पार्क, लक्ष्मीनगर, स्मशानभूमी, तुळजाभवानी मंदिर चौक, गुलमोहर कॉलनी, सिद्धी लॉन्स, सुदर्शन चौक ते कल्पतरू इस्टेट चौक, गणेशनगर, आनंदनगर, प्रभातनगर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव-दापोडी रोड, गंगोत्रीनगर या सर्व परिसरातील महापालिका आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, बहुतांश कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, ठेकेदार यांच्याकडे वारंवार मागणी करूनही ही कामे अर्धवट स्थितीत आहेत. विशेष म्हणजे इतक्या ठिकाणची कामे अर्धवट व धोकादायक अवस्थेत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकारी वर्गासमवेत पिंपळे गुरव परिसराचा दौरा करून कामांची पाहणी करावी. म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, ठेकेदार यांच्यामार्फत नेमकी काय दर्जाची कामे सुरू आहेत, याची कल्पना येईल. तसेच वस्तुस्थिती लक्षात येईल.
पिंपळे गुरवमधील जवळजवळ सर्वच ठिकाणची कामे अपूर्णावस्थेत असतानाही नवीन कामांचा शुभारंभ कसा काय केला जातो ? याबाबत अधिकारी, ठेकेदार वर्गाला आधीची कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन कामे सुरू करू नयेत, अशा सूचना कराव्यात, अशी मागणीही शामभाऊ जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading