सिमेवर लढायला मुलाला पाठविणारे पालक तयार व्हायला हवेत – अॅड.प्रशांत यादव
पुणे : राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये आहे. मात्र, आपली मुले शिकली पाहिजेत इतकाच विचार न करता, त्यांनी देश आणि समाजाचा विचार करायला हवा, अशी शिकवण पालकांनी द्यावी. आपला मुलगा डॉक्टर, वकिल होऊन पैसे कमवेल, असे स्वप्न आपण पाहतो. मात्र, सिमेवर देशासाठी लढायला मुलाला पाठविणारे पालक देखील तयार व्हायला हवेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग संघचालक अॅड.प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.
आधार सोशल फाउंडेशन व उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीने २०० रिक्षाचालकांना विमा प्रमाणपत्र व ई-श्रम कार्ड प्रदान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेत करण्यात आले.
फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप काळोखे, मंडळाच्या अध्यक्षा सविता काळोखे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. नगरसेवक धीरज घाटे, उद्योजक ललीत जैन, श्यामराव केवटे, अनिल काळोखे, पूरण हुडके, यशोधन आखाडे, विनायक घाटे, सचिन शुक्ला, गणेश येनपुरे, रोहित कदम, कृष्णा जाधव, राजेंद्र शिंदे यांसह रा.स्व.संघाचे पदाधिकारी व प्रचारक उपस्थित होते. कर्नल मंदार भुवड यांचे वडिल सुरेश भुवड यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमापूजन व ध्वजारोहण झाले.
अॅड.प्रशांत यादव म्हणाले, रिक्षाचालक हा स्वत:चे पोट भरण्याकरीता रिक्षा व्यवसाय करीत असला, तरी देखील समाजासाठी राबणारा घटक आहे. त्यामुळे त्याला सुविधा उपलब्ध करुन देत आपण श्रम देवतेची पूजा करीत आहोत. भारतात विविध उपासना पद्धतींचा सन्मान केला जातो. त्यामुळे मानवता टिकून आहे. सर्व जगाचे लक्ष याच कारणाने भारताकडे लागलेले आहे.
दिलीप काळोखे म्हणाले, रिक्षाचालक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांचा सन्मान वेगळ्या पद्धतीने करावा, याकरीता विमा प्रमाणपत्र व ई-श्रम कार्ड प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये १०४ रिक्षाचालकांना विमा प्रमाणपत्र तर १०० रिक्षाचालकांना ई-श्रम कार्ड देण्यात आले. याद्वारे रिक्षाचालकांना विमा व सरकारी योजनांना लाभ घेता येणार आहे. यापुढे देखील फाऊंडेशन व मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
