Pune – पालिकेत समाविष्ट 23 गावांमध्ये महानगरपालिके द्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
पुणे :पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना प्राथमिक सुविधा पुरविण्यातही सत्ताधारी भाजप अपयशी ठरलं आहे. त्यातही मानवाच्या आयुष्यातील जीवनावश्यक घटक असलेले पाणी पुरवण्याबाबत सत्ताधारी भाजपने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. तात्पुरती सोय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता परंतू सत्ताधाऱ्यांनी आता हे टँकरही बंद केले आहेत. परिणामतः या गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच या गावांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनाला विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्षा सीमा सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले वास्तविक पाहता ही गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर तातडीने त्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागायला हवा होता. मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून भारतीय जनता पक्षाने केवळ जाहिरातबाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणारी भाजपा प्रत्यक्षात नागरिकांच्या प्राथमिक सुविधाही पुरवू शकत नाही हे सिद्ध झाले आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणेकर नागरिक याची नक्की दखल घेतील. या प्रशासनाला जाग यावी म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत. व आंदोलन झाल्यावर आयुक्तांना निवेदन देणार आहोत .असे प्रशांत जगताप म्हणाले.
