Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या सिंगल ट्यूब कोव्हिडेल्टा चाचणी संचाद्वारे डेल्टा आणि ओमिक्रॉन संसर्गाचे अचूक निदान

पुणे: जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या भारतातील पुणेस्थित आणि अमेरिकेतील ॲन आर्बरस्थित संशोधन प्रयोगशाळांमध्ये विकसित केलेला ‘जीनपॅथ डीएक्स कोव्हिडेल्टा आरटीपीसीआर’ हा चाचणीसंच सर्व प्रकारच्या करोना विषाणूंचे, प्रामुख्याने जागतिक स्तरावर थैमान घालणा-या डेल्टा आणि ओमिक्रॉन संसर्गाचे अचुक निदान करतो हे स्पष्ट झाले आहे.

करोना संसर्गाचे निदान करण्यासाठी अधिकृत चाचणी म्हणून जीनपॅथतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘कोव्हिडेल्टा’ चाचणी संचाला आयसीएमआरने (इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) आधीच मान्यता दिली आहे. सीडीएससीओने (सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन) या संचांच्या उत्पादनासाठी ही परवानगी दिली आहे. सदर चाचणीत वापरण्यात आलेल्या नेमक्या मार्कर्समुळे करोना विषाणूच्या उत्परिवर्तनामध्ये होणारे जनुकीय बदल टिपणे शक्य होते. ‘डेल्टा ओमिक्रॉन ऑन ऑफ मार्कर’ हा असाच एक महत्त्वपूर्ण मार्कर असून त्याच्या सहाय्याने संसर्ग करणारे विषाणू हे डेल्टाचे आहेत की ओमिक्रॉनचे आहेत, हे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) एस-जीन टार्गेट ॲम्प्लिफिकेशन (एसजीटीए) आणि एस-जीन टार्गेट फेल्यूअर (एसजीटीएफ) शिफारशीनुसार दर्शवते. त्यामुळे एकाच चाचणीमध्ये कोविड १९ चे सर्व उत्परिवर्तन प्रकार विशेषत: ओमिक्रॉन आणि डेल्टा यांचे निदान होऊ शकते.

ही चाचणी विकसित करणारे जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे संस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. निखिल फडके म्हणाले, “जीनपॅथ डायग्नोस्टिक्स आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या संयुक्त भागीदारीतून या दीर्घकाळ चालणा-या संशोधनामध्ये अनेक वैद्यकीय नमुन्यांचा अभ्यास केला जाणार आहे. पुणे नॉलेज क्लस्टर ही भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांनी स्थापन केलेली आणि इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका) प्रशासित संस्था आहे. शहरातील कोविड-१९ विषयक अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मुख्य समन्वयक म्हणून पुणे नॉलेज क्लस्टरचे योगदान आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय यांच्याद्वारे करोना रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेंन्सिंग) केले जाते. जीनपॅथ आणि पुणे नॉलेज क्लस्टरच्या या संयुक्त भागीदारीमुळेच पुणे शहरातील पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाचे निदान विक्रमी वेळेत करणे शक्य झाले.”

पुणे नॉलेज क्लस्टरचे प्रिन्सिपल इन्वेस्टिगेटर प्रोफेसर एल. एस. शशिधर जीनपॅथचे अभिनंदन करताना म्हणाले, “आयसर पुणे आणि वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे करण्यात आलेल्या चाचण्यांमधुन जीनपॅथ डीएक्स कोविडेल्टा आरटीपीसीआर चाचणी संच हे महामारीचा सामना करण्यासाठी एक प्रभावी अस्त्र ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.”

जीनपॅथ डायग्नॉस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल जकातदार म्हणाले, “पुणे नॉलेज क्लस्टरद्वारे करण्यात आलेल्या मूल्यमापनातून जीनपॅथने विकसित केलेल्या चाचणी संचांची डेल्टा आणि ओमिक्रॉन उत्परिवर्तनांतील अचूक फरक ओळखण्याची क्षमता सिद्ध होते. त्यामुळे भविष्यात अचूक मात्र महागड्या आणि वेळखाऊ रोगनिदान चाचण्या करणा-या नेक्स्ट जनरेशन सिक्वेंसिंगसारख्या यंत्रणांवरील ताण कमी करणे शक्य होणार आहे.”

डॉ फडके पुढे म्हणाले, “ओमिक्रॉन आणि डेल्टा यातील विषाणू प्रकाराचे अचूक निदान झाल्यामुळे डॉक्टरांना योग्य ते वैद्यकीय उपचारांचे लवकरात लवकर नियोजन करण्यात मदत होते. यामुळे खर्च आणि वेळ वाचतो शिवाय योग्य ते उपचार वेळेवर मिळाल्यामुळे रुग्णांना फायदा होतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading