उघड्यावरील सांडपाणी व्यवस्थेमुळे विमानांना धोका; महापालिका करणार ड्रेनेज लाईनचे काम
पुणे : लोहगाव येथील विमान तळावरील रनवे पासूनच काही अंतरावरील खड्ड्यामध्ये सांडपाणी साठत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या सांडपाण्यावर पक्षी येत असल्याने विमानांना धोका पोहोचू शकतो, अशी बाब विमानतळ प्राधिकरणाने महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पालिका प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली असून समाविष्ट ११ गावांच्या ड्रेनेज लाईनचे काम करताना सुरुवात या ठिकाणा पासून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पक्षांमुळे विमानांना धोका निर्माण होण्याची भीती नुकतेच महापालिका अधिकारी आणि विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांनी विमानतळ व परिसरातील समस्यांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान रनवे वर ज्या ठिकानांहुन विमाने लँड होतात, तेथे जवळच खड्डा आहे. या खड्ड्यामध्ये लगतच्या परिसरातील सांडपाणी जमा होते. या सांडपाण्यामधील कीटक खाण्यासाठी पक्षी येत असतात. या पक्षांमुळे विमानांना धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे या सांडपाण्या प्रश्न मार्गी लावावा, असे विमानतळ प्राधिकरणाने महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
महापालिका अधिकाऱ्यांनीही तातडीने याबाबत उपाययोजना करण्याची तयारी दर्शविली आहे. नुकतेच समाविष्ट ११ गावातील ड्रेनेज लाईनची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याअंतर्गतच येथे ड्रेनेज लाईन विकसित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
तातडीने ड्रेनेज लाईन विकसित करण्याचा निर्णय
“लोहगावचा उर्वरित भाग नुकतेच महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्या भागात सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नसल्याने ते पाणी उघड्यावरूनच वाहात खड्ड्यांमध्ये साठते. त्यामुळे साठलेल्या पाण्यामध्ये वावरणारे किटक खाण्यासाठी पक्षी येतात. या पक्षांमुळे विमानांना त्रास संभवतो. या ठिकाणी संयुक्त पाहणीनंतर तातडीने ड्रेनेज लाईन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोनच दिवसांपूर्वी हे कामही सुरू करण्यात आले आहे.
-जगदीश खानोरे (अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग, पुणे महानगरपालिका)