क्रांती रेडकर दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्लॅनेट मराठीवर

यंदा क्रांती रेडकर व अक्षय बर्दापूरकर हे दोन्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले असून ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘मँगोरेंज प्रॉडक्शन’ अंतर्गत तयार होणारा ‘रेनबो ‘ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रांती रेडकरचा दमदार अभिनय आपण सर्वांनीच पहिला आहे. परंतु क्रांती आता आगामी ‘रेनबो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या आधी क्रांतीने ‘काकण’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते.

‘प्लॅनेट मराठी’ चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर व ‘मँगोरेंज’ प्रॉडक्शनच्या ह्रिदया बॅनर्जी यांनी ‘रेनबो चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘रेनबो’ या चित्रपटात प्रसाद ओक, उर्मिला कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि ऋषी सक्सेना ही मंडळी आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमधील बदलत जाणारी कलरफूल जर्नी प्रेक्षकांना ‘रेनबो’मधून अनुभवता येणार आहे.

‘ रेनबो ‘ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल अभिनेत्री, दिग्दर्शक क्रांती रेडकर म्हणते, ‘ प्लॅनेट मराठी ओटीटी ‘ मनोरंजनात्मक, संवेदनशील व समाजप्रबोधन करणारे विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘रेनबो’ च्या निमित्ताने आपण या प्लॅटफॉर्मचा एक भाग होणार आहोत या गोष्टीचा फार आनंद होतोय. माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिल्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी’ व अक्षय बर्दापूरकर यांचे आभार. ‘काकण’ या सिनेमानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा फार उंचावलेल्या आहेत त्यामुळे एक उत्तम गोष्ट असणारा सिनेमा मला बनवायचा होता . सर्वात आधी मी या चित्रपटाची गोष्ट लिहिली आणि नंतर याला साजेसे कलाकार मला मिळाले. हे सर्गळे माझे चांगले मित्र असून ते अतिशय उत्तम कलाकार देखील आहेत. म्हणूनच मी त्यांच्यासोबत काम करायला फार उत्सुक आहे . प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.”

या चित्रपटाविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”मी आजपर्यंत एक अभिनेत्री म्हणून क्रांतीचे काम पहिले आहे. तसेच तिने या आधी एका चित्रपटाचे उत्तम दिग्दर्शनही केले आहे. आता क्रांती ‘रेनबो’ चित्रपटाचे दिग्दर्शन करतेय याचा मला आनंद आहे. त्याचबरोबर चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. उत्तम दिग्दर्शक व ताकदीच्या कलाकारांमुळे नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल. ‘रेनबो’ च्या निमित्ताने प्रेक्षकांना आजच्या काळातील नात्यांचा कलरफुल प्रवास अनुभवायला मिळणार आहे.’’

Leave a Reply

%d bloggers like this: