शाळेमध्ये शिकविली जाणारी मराठी भाषा ही खरी शिदोरी – श्रीरंग गोडबोले

पुणे : लहानपणापासून भाषेचे व वाचनाचे संस्कार मुलांवर होणे गरजेचे आहे. शाळेमध्ये होणा-या वक्तृत्व स्पर्धा या खूप प्रोत्साहन देणा-या ठरतात. तर, चिंटू सारख्या माध्यमातून बालपण जगण्याचा अनुभव अनेकजण घेतात. चिंटू हा मराठीतून प्रेक्षक व वाचकांसमोर आला, हे महत्त्वाचे आहे. मराठी साहित्य चांगल्या माध्यमातून आणण्याचा आमचा प्रयत्न असून शाळेमध्ये शिकविली जाणारी मराठी भाषा ही आपली खरी शिदोरी आहे, असे मत चित्रपट दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी एचएचसीपी हायस्कूल फॉर गर्ल्स हुजूरपागा, लक्ष्मी रस्ता तर्फे आयोजित १६ व्या शालेय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम संस्थेच्या अमृतमहोत्सव सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी व्यंगचित्रकार चारुहास पंडित, भाग्यश्री पंडित, अभिनेता शुभंकर अत्रे, अनिमेष पाध्ये, सोसायटीच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रंजना वाठोरे, संमेलनाची उपाध्यक्षा विद्यार्र्थिनी प्रेरणा पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. चारुहास पंडित यांनी उपस्थितांसमोर दुस-या सत्रात व्यंगचित्र साकारले.

श्रीरंग गोडबोले म्हणाले, चित्रपट, दूरचित्रवाणी ही माध्यमे लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहेत. मात्र, वाचक तेवढया प्रमाणात नाहीत. त्यामुळे चित्रपट माध्यमाचा उपयोग करुन मराठी साहित्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. नाटक, चित्रपट, लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि कॅमेरा हे आजच्या काळातील करिअर म्हणून उत्तम मार्ग आहेत. त्यासाठी देखील उत्तम वाचन, लेखन गरजेचे आहे.

चारुहास पंडित म्हणाले, कार्टून्स ही मोठया प्रमाणात परदेशी आहेत. ती भारतीयांच्या भावनिक पातळीवर जोडली जात नाहीत. मात्र, चिंटूच्या माध्यमातून फक्त लहान मुलांसाठी नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मालिका तयार करण्यात आली. हे चित्रण निरागस असून मराठीतून आहे, हे महत्वाचे. त्यामुळे अशी अर्कचित्रे आपल्याला जवळची वाटतात, असेही ते म्हणाले. अभिनेता शुभंकर अत्रे, अनिमेष पाध्ये यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला.

Leave a Reply

%d bloggers like this: