पोलीस महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करतात – जगदीश मुळीक यांची टीका

पुणे : राज्यातील पोलीस महविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल सातत्याने अवमानकारक वक्तव्य करीत आहेत. ते पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या विरोधात तथ्यहीन, बेलगाम आणि खोटे आरोप करीत आहेत. या संदर्भात शहर भाजपच्या वतीने पुणे सायबर क्राईम स्टेशनमध्ये तक्रार करून दखलपात्र गुन्हा नोंदविण्याची मागणी १० जानेवारी रोजी करण्यात आली होती. परंतु आज सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल वाघमारे यांनी अशाप्रकारचा दखलपात्र गुन्हा नोंदविता येत नसल्याचे पत्र दिले.

मुळीक पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस एक न्याय देत असून, भाजपच्या कार्यकर्त्यांशी दुजाभाव करीत आहेत. या वरुन पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचे निदर्शनास येते. सर्वच क्षेत्रात अपयशी ठरत असलेले महाविकास आघाडी सरकार नैराश्याच्या भावनेने ग्रासलेले असून, त्यामुळेच पोलीसांवर दबाव टाकत सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. राज्यातील जनता या सरकारच्या जुलमी कारभाराला विटली असून, सरकार विरोधात असंतोष व्यक्त करण्याची संधी शोधत आहे. सरकारचा शहर भाजपच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात येत असून, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा जनआंदोलन केले जाईल.

Leave a Reply

%d bloggers like this: