रिपब्लिकन पक्षाच्या माजी नगरसेविका भागनबाई जाधव यांचे निधन
पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती भागनबाई दादू जाधव (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.१९९७ साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने त्या महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. महापालिकेतील स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले.रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या सात नगरसेवकांपैकी त्या एक होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी ट्रस्टच्या संचालिका तसेच रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून देखील त्यांनी काम केले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर येरवडा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
