Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

वाचन व विचारातून होतो चिकित्सक बुद्धीचा विकास – ज्येष्ठ साहित्यिक डॉ.आनंद करंदीकर

पुणे : विद्या म्हणजे पाठांतर किंवा घोकमपट्टी नव्हे. विद्येविना सारासार विचार करण्याची ताकद जाते. चिकित्सक पद्धतीने कोणत्याही गोष्टीची मिमांसा करणे म्हणजे विद्या. खूप वाचन आणि विचार यामधून चिकित्सक बुद्धीचा विकास होतो. त्यातूनच ख-या अर्थाने आपल्यातील गती व निती वाढते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व लेखक डॉ.आनंद करंदीकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी एचएचसीपी हायस्कूल फॉर गर्ल्स हुजूरपागा, लक्ष्मी रस्ता तर्फे आयोजित १६ व्या शालेय मराठी साहित्य संमेलनाचा उद््घाटन सोहळा संस्थेच्या अमृतमहोत्सव सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी लेखिका सरिता आव्हाड, मराठी काका अनिल गोरे, सोसायटीच्या मुख्य विश्वस्त जयश्री बापट, अध्यक्षा रेखा पळशीकर, सचिव वरदेंद्र कट्टी, रमाकांत सोनवणी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रंजना वाठोरे, संमेलनाची उपाध्यक्षा विद्यार्थीनी प्रेरणा पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. संमेलनाचे हे १६ वे वर्ष आहे. यानिमित्ताने आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद््घाटन करुन मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या प्रांगणात ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली.

डॉ.आनंद करंदीकर म्हणाले, विद्येतून चांगले-वाईट हा भेद करायला आपण शिकायला हवे, हा विचार महात्मा फुले यांनी दिला. विद्येविना शुद्र खचले, तशा स्त्रिया देखील खचल्या. मात्र, स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्र मुलींनी वाचायला हवी. आपले आयुष्य कसे जगावे, हे त्यातून शिकता येईल. स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रे हा मराठी भाषेचा ठेवा आहे. इंग्रजी भाषेत देखील असा ठेवा नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरिता आव्हाड म्हणाल्या, आत्मिक प्रेरणा प्रबळ असेल, तर संकटांना तोंड देणे सहज शक्य आहे. लेखन, कार्य अशा कोणत्याही रुपात आपण पुढील पिढीसमोर प्रेरणा ठेवायला हवी. प्रेरणा पवार म्हणाली, साहित्य हा समाजाचा आत्मा आहे. कवी, लेखकांचे साहित्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक जीवन, रुढी व परंपरांवर साहित्य भाष्य करते. चांगले लेखक व वाचक साहित्यातून क्रांती घडविण्याचा प्रयत्न करतात.

रेखा पळशीकर म्हणाल्या, शाळेच्या कालावधीत विद्यार्थीनी ग्रंथालयात जावून वाचन करतातच. मात्र, दिवाळी, नाताळ व मे महिन्याच्या सुटीत देखील विद्यार्थीनींनी ग्रंथालयात येऊन पुस्तके वाचावी. वाचनामध्ये स्पर्धात्मकता आल्यास अधिकाधिक वाचन होईल. मराठी साहित्यातून विद्यार्थीनींमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, याकरीता साहित्य संमेलन दरवर्षी आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सुधा कांबळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading