कलाकार कट्ट्यावर कॅरोल्स गात तरुणांनी साजरा केला ख्रिसमस
पुणे : भारतीय संस्कृती ही खरंतर एक ‘मिली-जुली’ संस्कृती आहे, जी विविध संस्कृतींच्या मिश्रणातून बनलेली आहे. म्हणूनच आपल्याला खाणे-पिणे, पोषाख, भाषा, कला यांमध्ये अनेक संस्कृतींच्या छटा दिसतात. याचंच एक प्रतीक म्हणजे आपल्याकडे विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. हीच आहे विविधतेतील एकता! याच उद्देशाने दरवर्षी प्रमाणे लोकायतच्या काफिला या सांस्कृतिक आघाडीने नाताळचा सण गुडलक चौक येथील कलाकार कट्टयावर साजरा केला.
या वेळी उपस्थित तरुणाईने सुद्धा कॅरोल्स गात एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. कॅरोल्स सोबत चल चलिए बुल्लाह फ़रीद जित्थे हे जाती धर्म पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणू जगायला लावणाऱ्या गाण्याचं हि सादरीकरण झाले. आज आपल्या देशात जातींमध्ये, धर्मा-धर्मांमध्ये जाणीवपूर्वक तेढ पसरवून त्यावर राजकारण केलं जात आहे. आपल्या भारतातील विविधता जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. म्हणून विविध सण मग ती ईद असो, दिवाळी असो, नाताळ असो हे सर्व सण लोकायत संघटना रस्त्यांवर येऊन एकत्रितपणे साजरे करते अशा भावना गीतांजली प्रकाश यांनी व्यक्त केल्या. येशूने आपले संपूर्ण जीवन प्रेम, दया, करुणा, शांती, बंधुभाव, क्षमा, त्याग, कृतज्ञता, सेवाभाव ही मूल्ये जनमानसात रुजवण्यासाठी अर्पण केले. अंधारमय काळात, येशूने प्रकाश पसरवण्याचे काम केले. म्हणूनच त्याच्या जन्मदिनी लोक कॅरोल्स गात घरोघरी जातात, एकमेकांना भेटतात, मिठाई वाटतात व आनंद साजरा करतात असे प्रतिपादन स्नेहसदन संस्थेचे फादर पीटर D’Cruz यांनी केले.या प्रसंगी काही तरुणांनी सांताक्लॉझचाही पेहराव केला होता व ख्रिसमस या झाडाचं प्रतीकात्मक झाडही बनवले होते. प्यार बांटते चलो, क्या हिन्दू क्या मुसलमान हम सब हैं भाई भाई या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अक्षय राऊत यांनी केले.
