Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

अवयवदानाबाबत भारतीय मानसिकतेत बदल होणे गरजेचे – डाॅ.शैलेश पुणतांबेकर

पुणे : आजही मृत व्यक्तीच्या बाबतीत कुटुंबाची भावनिक गुंतागुंत असल्याने भविष्यातील डाॅक्टरांना शरीर शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मृतदेह उपलब्ध होत नाहीत. एवढेच नाही तर आज अवयवाची आवश्यकता असलेल्यांची प्रतिक्षा यादी वाढत चालली आहे. हे चित्र बदलायचे असेल तर अवयवदानाबाबत भारतीय मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ रोबोटिक लॅप्रोस्कोपी, कॅन्सर सर्जन आणि गॅलॅक्सी केअर मल्टीस्पेशालिटी ग्रुप आॅफ हाॅस्पिटलचे वैद्यकीय संचालक डाॅ.शैलेश पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.

उपचार सुरु असलेल्या गरजू रुग्णांना वेळेत अवय मिळावे यासाठी कार्यरत असलेल्या आणि अवयवदानासाठी जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य करणा-या संस्थेला अथवा व्यक्तीला दरवर्षी आडकर फौंडेशनतर्फे कोमल पवार स्मृती पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी री-बर्थ फाउंडेशन या संस्थेला डाॅ.शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रि-बर्थ फाउंडेशनच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कोमल न्यू-लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गोडसे, आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर, मैथिली आडकर आदी उपस्थित होते.सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

डाॅ.शैलेश पुणतांबेकर म्हणाले की, आज गॅलॅक्सी केअर मल्टीस्पेशालिटी ग्रुप आॅफ हाॅस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि डाॅक्टर म्हणून प्रत्यक्ष काम करीत असतांना, केवळपैसे आणि अवयव नाहीत म्हणून अनेक मृत्यू पाहवे लागतात. अवयवदानाच्या क्षेत्रात जेवढे काम होणे अपेक्षित आहे त्याच बरोबरीने निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने देखील समांतर प्रयत्न होणे गरजेचे आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील सी.एस.आर. अंतर्गत वितरीत होणारा निधी या क्षेत्राकडे वळवता आला पाहिजे.
अवयवदानाबाबत प्रशासकीय पातळीवर देखील समज गैरसमज आहेत. आम्ही ज्यावेळी पहिले गर्भपिशवीचे प्रत्यारोपण केले, त्यावेळी या अवयवांच्या प्रत्यारोपणाच्या अावश्यकते पासून अनेक पातळ्यांवर प्रश्न उपस्थित केले गेले. केवळ पैसे आणि अवयव नाहीत म्हणून होणारी किमंती मनुष्य हानी भरुन न येणारी आहे.

आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले आणि उपस्थितांचे आभार मानले. रि-बर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांनी देखील यावेळी अनुभव कथन केले. कोमल न्यू-लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गोडसे यांनी फाउंडेशन स्थापनेमागील भूमिका विषद केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading