आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण : ‘न्यासा’ कंपनीचे अधिकारी जबाबदार
पुणे : मागील २४ ऑक्टोबर रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट ‘क’चा पेपर फुटला होता. या प्रकरणात अनेक जणांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र या पेपरफूटी प्रकरणात पेपरची छपाई करणाऱ्या ‘न्यासा’ कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अमिताभ गुप्ता म्हणाले, ‘म्हाडा’ भरती परीक्षे आधी एका पेपर फेडणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात आला होता. या भरती परीक्षेचा पेपर फुटण्याआधीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी आरोग्य विभागाचा गट ‘क’चा पेपर सुद्धा फोडण्यात आल्याचे समोर आले. तसेच गट ‘ड’ चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित आहेत का? याचा तपास सुरू आहे. गट ‘क’ चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता दिली.
आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा ही जबाबदार असल्याचे सांगत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती देताना गुप्ता म्हणाले, एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. न्यासाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका प्रिंट करताना पेपर फोडला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.
