संकल्पना विकसनासाठी लेखन आवश्यक – प्रा. सु. ह. जोशी
पुण्याच्या पूर्व भागातील आबासाहेब अत्रे प्रशालेतील मुलांच्या ‘लेखन प्रकल्पानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
पुणे : कोविड काळात आॅनलाईन दृक-श्राव्य पध्दतीने शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे लेखनाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. आकलनक्षमता व संकल्पना विकसनासाठी लेखन आवश्यकच आहे. मुलांनी रोज किमान अर्धातास तरी लेखन करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ लेखक व पत्रमित्र प्रा. सु. ह. जोशी यांनी व्यक्त केले.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे प्र्शालेतील विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या ‘लेखन प्रकल्पातील विजेत्या विद्यार्थ्यांनी’ जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. ‘तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे मुलेच नाही तर शिक्षक, पालक व एकंदरीत सर्वांचेच प्रत्यक्ष लेखन कमीच होत आहे. वाचणे, पडद्यावर पाहणे यापेक्षा एखादी गोष्ट लिहिण्यास अधिक वेळ लागत असला तरी प्रत्यक्ष लिहिल्याने लक्षात राहण्यास सुलभता येते. विचारांना शब्दबध्द करण्यासाठी लेखनासारखा दुसरा पर्याय नाही. लेखनाने माणसाच्या विचारांना परिपूर्णता येण्यास सुलभता येते.’
आॅनलाईन शिक्षण घेताना मुलांचे लेखनाकडे दुर्लक्ष होउ नये यासाठी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी अत्रे प्रशालेत ‘लेखन प्रकल्पाचे आयोजन केले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना माजी राष्टÑपती डॉ. अब्दुल कलाम यांचे छोटेखानी चरित्र, वही-पेन भेट देउन त्यांना भावलेले प्रसंग वा संपूर्ण पुस्तक लिहून वही जमा करायची होती. सहभाग नोंदवलेल्या ८० मुलांमधून सुवाच्च व सुबक अक्षरात लिहिलेल्या तायरा शेख, शाहिन शेख, नेहा दिवेकर, सुप्रिया गायकवाड, शितल बनसोडे, दिनेश खरात, आरुष शेळके या विद्यार्थ्यांना जोशी यांच्या हस्ते शैक्षणिक व क्रीडा साहित्य देण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापिका दीपमाला धायगुडे, संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, केशव तळेकर, माजी विद्यार्थी संजय गवळकर आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी नेने घाट गणेश मंडळ, हेल्पिंग हॅन्डस संस्थेचे सहकार्य लाभले.
