Saturday, October 31, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

गायन, अभिनयानंतर केतकी माटेगांवकर आता संगीतकाराच्या भूमिकेत

पुणे : गायन व अभिनयानंतर केतकी माटेगांवकर आता संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. पदार्पणातच केतकीने संगीतबद्ध केलेल्या रचना जागतिक कीर्तीचे कलाकार असलेल्या महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर यांनी  गायल्या आहेत. इतकेच नव्हे तर गायन क्षेत्रातील केतकीचे गुरु असलेले पं. रघुनंदन पणशीकर यांनी स्वत: व आई सुवर्णा माटेगांवकर या दोघांनी देखील तिने संगीतबद्ध केलेल्या रचना गात केतकीच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले आहे.

आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केतकी माटेगांवकर हिने या विषयीची अधिकृत घोषणा केली. केतकीची आई व प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगांवकर, वडील पराग माटेगांवकर यावेळी उपस्थित होते.

केतकी म्हणाली, मला संगीताच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडते. माझ्यासाठी हा योग्य मार्ग आहे, असे नेहमी वाटत आले. आपल्याकडे फारशा महिला संगीतकार न झाल्याने एखाद्या गाण्याकडे, चालीकडे पाहण्याचा एका स्त्री संगीतकाराचा एक वेगळा दृष्टीकोन या निमित्ताने श्रोत्यांना अनुभवता येईल. संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा खन्ना आणि अलीकडच्या काळात वैशाली सामंत या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संगीतकार डोळ्यासमोर येतात. हे चित्र बदलावं आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी काही प्रमाणात तरी संगीत दिग्दर्शन क्षेत्राकडे वळावे, असे मला मनापासून वाटते.

माझ्या अभिनय व गायन कलेचे कौतुक रसिकांनी नेहमीच केले. महाराष्ट्राची कन्या म्हणून मला सिने व संगीत रसिकांनी खूप प्रेम दिले. आता संगीतकार म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे, याची जाणीव आहे. अपेक्षांचे दडपण असले तरी ही जबाबदारी पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करेल, असा विश्वास केतकी माटेगांवकर हिने यावेळी व्यक्त केला.

केतकी माटेगांवकर हिने संगीत दिग्दर्शन केलेला ‘माई’ हा अल्बम लवकरच रसिक श्रोत्यांच्या भेटीला येत असून यामध्ये दोन भागांत एकूण ९ गाणी असतील. केतकीची पणजी माई यांच्या रचना यामध्ये संगीतबद्ध करण्यात आल्या असून धार्मिक, सकारात्मक, भक्तीमय भाव हे याचे वैशिष्ट्य आहे. वर नमूद गायक – गायीकांबरोबरच मीनल माटेगांवकर आणि अक्षय माटेगांवकर यांनी देखील या अल्बममध्ये गाणी गायली आहेत.

लवकरच केतकी माटेगांवकर या अधिकृत यु ट्यूब चॅनल बरोबरच स्पॉटीफाय, मॅजिक मिस्ट व इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे ही गाणी रसिकांना अनुभविता येणार आहेत.

Leave a Reply