येरवडा – ढोलेपाटील-नगररोड क्षेत्रीय कार्यालयाची धुरा “अकबरा”च्या हाती
पुणे – महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात मधून नगरसेवकांकडून कोट्यावधी रुपयांची विकासकामे होत असतात. ही विकास कामे करत असताना “नगरसेवक -अधिकारी – ठेकेदार” ही मंडळी अतिशय “प्रामाणिक”पणे विकास कामांची “कामे” दाखवतात. सर्व अटी व शर्तींच्या अधीन राहून “कागदांवरची विकासकामे” करत निधीचे योग्य प्रमाणात वाटप केले जाते. सध्या या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एका प्रमुख “अकबरा”ने स्वतःची मोक्याची जागा तयार केली आहे.
कनिष्ठ अभियंता पासून ते थेट उपायुक्तापर्यंत “तेच” हि जबाबदारी कुशलपणे पार पाडत आहे. टेंडर लावण्यापासून ते टेंडर कोणाला द्यायचे, कोणाला पात्र-अपात्र करायचं, यासोबतच क्षेत्रीय कार्यालय चालविण्याचे धडेच त्यांच्याकडून दिले जातात. पूर्वी हे सर्व काही एकमेकांना विश्वासात घेऊन सुरू होते. मात्र या बाहेरून आलेल्या अकबराला क्षेत्रीय कार्यालयातील “अधिकाऱ्यांच्या माहितीचा” खडान्खडा अभ्यास झाल्यामुळे आता तेच खरे “कारभारी” झाले आहेत. त्यांच्या अधिकारात जास्तीची माहिती उपलब्ध झाल्यामुळे अधिकारीही आता त्यांच्यापुढे हतबल झाले आहेत. त्यामुळे त्यांचा “आदेश” घेऊनच अधिकार्याला काम करावे लागते. अन्यथा मागील काळात केलेला “अर्थपूर्ण विकास” बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या जातात. एकंदरीतच नगरसेवकांना स्थानिक पातळीवर विकास कामांसाठी मिळणारा निधी हा चोरांच्या हातात गेला आहे. सर्व काही आलबेल असे म्हणत अधिकारी दिवस काढत आहे. नगरसेवकांकडून केली जाणारी मुस्कटदाबी, कार्यकर्त्यांची दमबाजी, आणि “एकमेका सहाय्य करु” म्हणत पूर्वी केलेल्या अर्थपूर्ण चुकांमुळे हतबल अधिकारीदेखील त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडतात. त्यांच्या सल्ल्याशिवाय ते एकही काम करू शकत नाहीत.
एकंदरीतच या सर्व यंत्रणा यात फार मोठा भ्रष्टाचार होत असून, जनतेच्या करातून दिल्या जाणाऱ्या निधीचा प्रत्यक्षात वापर न होता लाखो रुपयांचा “अपहार” होत आहे. या यंत्रणेकडून मोठ्याप्रमाणावर नियमबाह्य पद्धतीने दिखाऊ चमकोगिरीची विकासकामे सुरू आहेत. त्यावर ना कोणाचा अंकुश न कारवाई त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांवर राज्य करणाऱ्या या अकबरांचा सध्या बोलबाला आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना काळात कोणाचेही लक्ष व भीती नसल्यामुळे उपलब्ध भरपूर निधी त्यांनी मार्गी लावला आहे. त्यानंतरचे चालू आर्थिक वर्ष हे अखेरचे असल्यामुळे कमी प्रमाणात उपलब्ध निधीवर देखील हात मारण्यासाठी त्यांचा डोळा आहेच. एकंदरीतच या यंत्रणेवर कोण नियंत्रण आणणार? कारण प्रत्येकजण एकमेकांमध्ये अडकलेला आहे. एकमेकांसाठी केलेल्या अर्थपूर्ण कार्यातून प्रत्येक जण स्वतःला वाचवत एकमेकांची पाठराखण करत आहेत. भविष्यात यांची ही सर्व प्रकरणे उघड झाल्यास क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणारे हे “अकबर” अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
