Thursday, June 25, 2026
Latest NewsPUNE

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १९ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १९ डिसेंबरला पुणे शहराच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

मुळीक म्हणाले, सहकार मंत्री म्हणून पदभार स्विकारल्या नंतर शाह पहिल्यांदाच पुणे भेटीवर येणार आहेत. पुणे महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार केले जाणार असून, त्याचे भूमिपूजन शाह यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे.

मुळीक पुढे म्हणाले, शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर भाजपच्या वतीने ‘बूथ कार्यकर्ता संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात शाह यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मुळीक पुढे म्हणाले, मेळाव्याच्या तयारीसाठी शहर कार्यकारिणी, विधानसभा मतदारसंघ आणि प्रभागनिहाय बैठका सुरू आहेत. सर्व आघाड्या, मोर्चांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि बूथ समिती सदस्यांच्या बैठकांचे आयोजन सुरू आहे. मेरा परिवार, भाजप परिवार या विषयावर शाह मार्गदर्शन करणार आहेत. शाह यांच्या दौर्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अमित शाह घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

गृहमंत्री अमित शाह येत्या रविवारी (१९ डिसेंबर) सकाळी दहा वाजता पुणेकरांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने यांनी कळविली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading