Indian Idol Marathi – आळंदीच्या अश्विनी मिठेने घेतला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव
पुणे : सोनी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाला गेले काही आठवडे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे . १४ स्पर्धकांमध्ये सुरू झालेल्या या सुरांच्या मैफिलीला ग्रँड प्रिमिअरपासून अधिकच प्रतिसाद मिळू लागलाय. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून अनेक स्पर्धकांनी आपली हजेरी लावली होती . त्यातूनच पुण्यातील आळंदी येथील अश्विनी मिठे (Ashwini Mithe) हिची टॉप १४ स्पर्धकांमध्ये निवड झाली . इंडियन आयडलच्या मंचावर अश्विनी आपल्या वडिलांचे पार्श्वगायिका बनण्याचे स्वप्न घेऊन आलेली आहे अत्तापर्यंत झालेल्या सादरीकरणांमध्ये आळंदीच्या अश्विनी मिठे हिने आपल्या खड्या आवाजाने परीक्षक अजय – अतुल यांच्यावर भुरळ पाडत तसेच तिने निवडलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे .
अश्विनी हि मूळची पुण्यातल्या आळंदीची. देवाची आळंदी अशी ओळख असणाऱ्या शहरातून आलेल्या अश्विनीने मोठ्या जिद्दीने, मेहनतीने ‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या पर्वासाठी स्वतःचं स्थान निश्चित केलंय. वारकरी संप्रदायाचा वारसा चालवत आपल्या वडिलांबरोबर भजन , कीर्तनाचे कार्यक्रम बघून अभंग आणि गवळणी ऐकून गाण्याची आवड निर्माण करणाऱ्या अश्विनीने इंडियन आयडल मराठीच्या मंचावर तिच्या गाण्यांने एक वेगळंच वातावरण तयार केले आहे . गाण्यामध्ये करियर व्हावे म्हणून अश्विनी जालन्यावरून आळंदीत स्थायिक झाली आहे. थिएटर राउंडला ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला हे गाणं, ‘ही पोली साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद हे हळदीला वाजणारं लोकप्रिय गाणं ग्रँड प्रिमियरमध्ये सादर केल्यानंतर आता येत्या आठवड्यात ती कुणीतरी येणार गं हे गाणं सादर करणार आहे.
