‘फोटोथॉन २०२१’ छायाचित्रण स्पर्धेतून होणार पर्यावरण जनजागृती
पुणे : पर्यावरणाचे जतन करीत त्याचे महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी इकोफोक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळतर्फे फोटोथॉन २०२१ ही छायाचित्रण स्पर्धा पुण्यात होणार आहे. नेमून दिलेल्या अवघ्या २४ तासाच्या वेळेत लाईव्ह छायाचित्र काढून स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. शनिवार, दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नवी पेठेतील म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे स्पर्धेचे उद््घाटन होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक परेश पिंपळे यांनी दिली.
स्पर्धेच्या दिवशी छायाचित्रकारांनी नवी पेठेतील म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृहात एकत्रित यायचे आहे. उद््घाटनानंतर २४ तासांमध्ये छायाचित्रकारांनी त्यांचे कौशल्य वापरुन पर्यावरणाशी संबधित विविध छायाचित्रे टिपायची आहेत. आजच्या युगात जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आहे. या गोष्टीचा फायदा जर प्रत्येकाने पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा विचार मांडण्यासाठी केला, तर या चळवळीला व्यापक जनसहभाग मिळेल. फोटो विथ व मोटो हा विचार पर्यावरण चळवळीत मोठा बदल घडवेल आणि हेच फोटोथॉनचे वैशिष्टय आहे.
एक छायाचित्र हे १ हजार शब्दांचा अर्थ सांगते, त्यामुळे या विचाराने स्पर्धेची सुरुवात झाली. एखादे छायाचित्र सर्व बंधनांच्या पलिकडे जाऊन संवाद साधण्याचे परिणाम साधू शकते. त्यामुळे पर्यावरणाशी निगडीत विविध स्तरांवर चित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यामाध्यमातून छायाचित्रकार करणार आहेत. व्यावसायिक, शिकाऊ, नवोदित अशा १८ वर्षावरील सर्व छायाचित्रकारांसाठी स्पर्धा खुली आहे. पुणे फोटोग्राफी लव्हर्स संस्था व भारतीय फोटोग्राफी संस्थेचे स्पर्धेला सहकार्य मिळाले आहे. फोटोथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पर्यावरणदिनी ५ जून रोजी गौरविण्यात येणार आहे.
फोटो स्टोरी, नेचर, मोबाईल छायाचित्र आदी श्रेणीत पारितोषिके दिली जाणार आहेत. फोटो स्टोरीकरीता प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार रुपये व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. तर इतर तीन विभागांकरीता रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सुमारे १ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यापूर्वी विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी फोटोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
