शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे केवळ वाक्य नव्हे तर बाबांसाहेबांच्या जीवनाचा भाग
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण भारतासाठी एक प्रेरणा स्रोत आहेत. त्यांचे कार्य मुख्यतः अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीअंतासाठी असले तरी त्यापलिकडे जाऊन त्यांनी भारतातील सर्व वंचितांना, कष्टकऱ्यांना, महिलांना, अल्पसंख्यकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हे केवळ त्यांचे एक वाक्य नव्हे तर त्यांची जगण्याची शैली होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोकायत आयोजित पाठ्यपुस्तकांच्या पलीकडील बाबासाहेब या कार्यक्रमाच्या वेळी निश्चय म्हात्रे यांनी हे मत मांडले.
शुभम हल्ले यांनी बाबासाहेबांच्या कामगार व स्त्रीयाबद्दलच्या कामा बद्दल बोलताना म्हणाले की त्यावेळी बहुसंख्य दलित हे कामगार कष्टकरीच होते आणित्यामुळे सर्व कष्टकऱ्यांचा विकास म्हणजेच दलितांचा विकास या भूमिकेतून बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना1938 साली केली. भारतातील सर्वात
पहिला अधिकृत कामगार पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला. भारतातील कामगार हे
भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही अशा दोन्ही व्यवस्थांचे बळी आहेत हेत्यांनी अगदी अचकू हेरले होते.
महिला बंधनांतून मुक्त व्हाव्या तसेच सामाजिक दृष्ट्या सुदृढ झाल्या पाहिजे या साठी हिंदू कोड बिल बनवले होते. ज्यात स्त्रीपुरूषांना संपत्तीत समान अधिकार, स्त्रियांना मुल दत्तक घेण्याचा अधिकार, आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता, घटस्फोट सिद्ध करण्याची सक्ती सारखे कायदे करण्यात आले होते.
औद्योगिक कलह बिल 1938 केलेला विरोध, भारताच संविधान बनवण्यामधील योगदान याबाबतही चर्चा करण्यात आली.
बाबासाहेबांचा संघर्ष आणि त्यांचे विचार गाणी-छोटे व्हिडिओ-चर्चा यांच्या संमिश्रणातून सादर केला गेला.
बाबासाहेब हे केवळ दलितांचे नेते होते ज्यांनी एससी एसटी आरक्षण आपल्या संविधानात आणले किंवा केवळ महार जातीच्या लोकांचा नेता या संकुचित साच्यातून बाहेर पडण्यास मदत झाली असे कार्यक्रम संपल्यावर उपस्थितीतांनी प्रतिक्रिया दिल्या.
कार्यक्रमाची सुरवात चवदार तळ्याच्या काठी, माझा भीम मला भेटतो बाई, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना या बाबासाहेबांच्या कर्तुत्वाची आठवण करून देणाऱ्या गाण्यांनी झाली. तरुणांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अक्षय राऊत यांनी केले.
