Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली वसतीगृहाची पाहणी

पुणे : राज्यात ७ ऑक्टोबर २०२१ पासून सामाजिक न्याय विभागाचे शासकीय वसतिगृह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून ३ डिसेंबर रोजी समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी पुणे येथील येरवडा परिसरातील विभागाच्या वसतीगृहांची पाहणी केली.

यावेळी समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त भारत केंद्रे, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड,पुण्याच्या सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, गृहप्रमुख संतोष जैन आदी उपस्थित होते.

नारनवरे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली व त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यात ४४१ शासकीय वसतिग़ृहे असून विभागीयस्तरावर १००० क्षमतेचे ७ वसतिगृह आहेत या सर्व वसतिगृहांमध्ये साधारण ५० हजार विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे. शासनाने घालून दिलेले सर्व नियम व अटींची पूर्तता करावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताला सर्वाधिक महत्त्व देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, लसीकरण झाले नसल्यास स्थानिक प्रशासनाच्यावतीने लसीकरण करणे, संपूर्ण वसतिगृह वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छतेला प्राधान्य देणे व आपत्कालीन परिस्थितीमध्ये विलिगीकरणासाठी एक कक्ष राखीव ठेवणे यासारखे उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी सांगितले.

वसतीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर ठेवावे, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक करावे, वारंवार वापरात येणाऱ्या साहित्याचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे असेही ते म्हणाले.

राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याशी संपर्क साधून तेथे प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावा व सदर अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह त्याच वसतीगृहात सादर करावा असे आवाहन  नारनवरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading