गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत जपानच्या सारा साईतो हिला दुहेरी मुकुट
- मुलांच्या गटात एकेरीत तानपात निरुद्रोणने, तर दुहेरीत ऋषील खोसला यांना विजेतेपद
एकेरीत मुलींच्या गटात जपानच्या तिसऱ्या मानांकित साईतो हिने भारताच्या वैष्णवी आडकरचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 55 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये वैष्णवीने सुरेख सुरुवात करत साराची दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-0 अशी आघाडी घेतली. पण पिछाडीवर असलेल्या साराने जोरदार कमबॅक करत पाचव्या व नवव्या गेममध्ये वैष्णवीची सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये साराने आपला खेळ उंचावत आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर हा 7-6(4) असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये साराने आक्रमक खेळ करत वैष्णवीला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही. या सेटमध्ये साराने दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये वैष्णवीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-0 असा सहज जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. सारा ही अरातो ज्युनियर हायस्कूलमध्ये अकरावी इयत्तेत शिकत असून मॅट टेनिस अकादमीत प्रशिक्षक हायतो मतसुदा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
