डॉ. अरुणा ओसवाल यांना पहिला ‘सूर्यदत्ता भगवान महावीर ग्लोबल अवॉर्ड-२०२१’ प्रदान
पुणे : “आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण आयुष्यात मनःशांतीसाठी ध्यान-धारणा अधिक महत्वाची आहे. भगवान महावीरांच्या नावाने उभारलेल्या या सभागृहात विद्यार्थी, पालक, कर्मचाऱ्यांनी ध्यानधारणा करावी. आपल्या व्यक्तिगत जीवनात आरोग्य, मनःशांती, एकाग्रता प्राप्त करावी. आपल्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने घेतला हा पुढाकार कौतुकास्पद आहे,” असे मत अभेय ओसवाल ग्रुप आणि अरुणा ओसवाल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ओसवाल यांनी व्यक्त केले.
डॉ. अरुणा ओसवाल यांच्या हस्ते सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये भगवान महावीर सभागृहाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी ओसवाल यांना ‘सूर्यदत्ता’च्या वतीने दिला जाणारा पहिला ‘सूर्यदत्ता भगवान महावीर ग्लोबल अवार्ड-२०२१’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सल्लागार समितीचे सदस्य सनी अवसरमल, लायन्स क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, प्रांतपाल हेमंत नाईक, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी, कॅबिनेट ऑफिसर शिवाजी चमकेरे यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी, सूर्यदत्ता संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पितालिया यांनी केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “नेहमीच सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कल्पक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः सभागृहांना नावे देताना त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, यावर भर दिला जातो. प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा हा त्यामागे उद्देश असतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जीवन सुखी व्हावे, या उद्देशाने या सभागृहाला त्यांचे नाव दिले आहे.”
डॉ. अरुणा ओसवाल म्हणाल्या, “ज्या उद्देशाने भगवान महावीर यांच्या नावाने हे सभागृह सुरु झाले, तो उद्देश सफल व्हावा. सूर्यदत्ता परिवारातील सर्वच सदस्यांना विशेष अनुभूती यावी. या गर्दीतून दूर होऊन एकट्याने काही वेळ स्वतःसाठी घालवला, तर स्वानुभूती घेता येईल. सूर्यदत्ताने घेतलेला हा पुढाकार अत्यंत मार्गदर्शक आहे. अत्यंत नम्रपणे या पुरस्काराचा स्वीकार करते. दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा खरा आनंद शोधायचा आपला प्रयत्न आहे. माझे दिवंगत पती अभय ओसवाल यांच्या प्रेरणेने आपण सामाजिक कार्यात योगदान देत आहे. प्रा. संजय चोरडिया यांच्या प्रयत्नातून सुर्यदत्ता एज्युकेशनल फाउंडेशनने केजी ते पीजी शैक्षणिक प्रवासात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. संस्थेच्या भावी प्रकल्पांमध्ये मलाही योगदान द्यायला आवडेल.”
