राधिका राणे – भोसले ठरल्या अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या मिसेस आशिया युएसए स्पर्धेच्या उपविजेता

पुणे  :  राधिका राणे- भोसले यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या मिसेस आशिया युएसए स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस आशिया या स्पर्धेत त्यांनी केलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील प्रेरित पेहरावाला उपस्थितांची विशेष पसंती मिळाली.

व्हर्जेलिया प्रोडकशन्स यांच्या वतीने अमेरिकेत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या मिसेस आशिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. खास विवाहित महिलांसाठी असलेल्या या स्पर्धेत सौंदर्य स्पर्धा, सामाजिक सेवा, वेशभूषा, नृत्य आणि गाऊन स्पर्धा अशा विविध विभागात गुण मिळवीत विजेता ठरविला जातो. यावर्षीच्या अंतिम फेरीसाठी आशिया खंडातील विविध देशांमधून तब्बल ४८ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या राधिका यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

राधिका राणे- भोसले यांनी अभियांत्रिकी विषयातील पदवी शिक्षणानंतर बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून अमेरिकेतील एसजीएस टेलिकॉम या तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट अपमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. २०१५ साली फेसबुकमध्ये वरिष्ठ सुरक्षा अभियंते म्हणून कार्यरत असलेल्या पुण्यातील अमर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन वर्षांचे मुल असून आपल्या करिअर सोबतच अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या ब्रॅण्डसाठी त्या मॉडेलिंग करतात. त्यांचे सासू सासरे शिरीष व शर्मिला भोसले, आई वडील राजन व रश्मी राणे, इतर कुटुंबीय, अमेरिकेतील सनीवेल शहराचे महापौर लॅरी क्लायन यांचे विशेष सहकार्य राधिका यांना मिळाले. राधिका यांना दिलेल्या शुभेच्छांबद्दल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.

या स्पर्धेतील यशाबद्दल आणि पोषाखाबद्दल बोलताना राधिका राणे भोसले म्हणाल्या की, स्पर्धेअंतर्गत असलेल्या वेशभूषा विभागातील सहभागामध्ये मी समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख दाखविण्याच्या दृष्टीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांपासून प्रेरित होत पेहराव केला होता. यामध्ये चिलखत, शस्त्रे परिधान केलेली युद्धा आणि महाराष्ट्राच्या पारंपारिक राजेशाही दागिन्यांसह असलेली राजकन्या यांचा मिलाफ मी साधला होता. भारतीय स्त्रीचे सौंदर्य व आत्मसन्मान जपणारे मजबूत, अढळ व्यक्तीमत्त्व साकारण्याचा माझा हा एक प्रयत्न होता. भारतीय महिलांची सर्व आघाड्यांवर प्राणप्रणाने लढणारे व्यक्तीमत्त्व दर्शन मला करायचे होते. कुटुंब आणि करिअर अशा आघाड्यांवर लढणा-या प्रत्येक भारतीय स्त्रीच्या लढाऊपणासाठी मी हा सन्मान समर्पित करू इच्छिते.

Leave a Reply

%d bloggers like this: